बिबट्याने घेतला सहावा बळी, वनविभागाचा सुस्त कारभार

26

सामना ऑनलाईन । जळगाव

चाळीसगाव तालुक्यात पाच जणांचा लागोपाठ बळी घेणाऱ्या बिबट्याने मंगळवारी पहाटे सहावा बळी घेतला आहे. नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश सोमवारी राज्याच्या वनमंत्र्यांनी देऊन काही तासांचा अवधी होत नाही तोच चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला चढवल्याने वृद्धेचा बळी गेला आहे. बिबट्याच्या हल्यातील मयतांची संख्या सहावर पोहोचली आहे.

यमुनाबाई तिरमली (७०) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून वनविभागाला पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागले.

यमुनाबाई तिरमली यांच्या झोपडीवजा घरात कुटुंबातील तीन मुलांसह झोपल्या होत्या. त्याचवेळी नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर तिरमली यांची मान आढळली तर धडाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. यमुनाबाई यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला, त्यांना ओढत जंगलाकडे नेत असताना ओरडण्याचा तसेच सर्र-सर्र आवाज झाल्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. वरखेडे खुर्द गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा शोध घेत असताना ही घटना घडल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास सुमारे २० कर्मचारी दाखल झाले.

सुस्त वनविभाग कारणीभूत

नरभक्षक बिबट्याच्या उच्छादाने मंगळवारच्या घटनेसह पाच महिन्यात तब्बल सहा जणांचे बळी गेले आहेत. अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे, ट्रॅन्क्यूलायझर गन व शॉर्प शुटरसह ३५ जणांची टीम बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थांमध्ये वनविभागाच्या कार्यपद्धत्तीविषयी तीव्र रोष उफाळला आहे. राहुल चव्हाण (८), अलका अहिरे (५०), बाळू सोनवणे (२५), दीपाली नारायण जगताप (२५), सुसाबाई धना नाईक (५५) या सर्वांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे.

सतत होणाऱ्या बिबट्याच्या हल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वनमंत्र्यांनी बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देऊन काही तास होत नाही तोच वृद्धेचा बळी गेल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध सुटला आहे. निष्पापाचे नाहक प्राण जात असल्याने किमान आतातरी प्रशासन व वनविभागाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या