संभाजीनगर : लाच घेणाऱ्या वाल्मीचे महासंचालक, सहसंचालकांना रंगेहाथ पकडले

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

नोकरीत कायम करण्यासाठी दहा लाखांची लाच मागणाऱ्या जल आणि भूमी व्यवस्थापनाचे महासंचालक, जलसंधारण आयुक्तालय संभाजीनगरचे आयुक्त हरिभाऊ गोसावी व वाल्मीचे सह संचालक राजेंद्र क्षीरसागर या दोघांना १० लाखांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या दालनात रंगेहाथ पकडले. त्या दोन अधिकाऱ्यांचे घरे पुणे, नाशिक आणि सोलापुरात असल्यामुळे त्या ठिकाणी स्वतंत्रपणे घरांची झडती घेण्यात येत आहे.

वाल्मीमध्ये गेल्या १२ वर्षापासून तक्रारदार हा हंगामी पदावर कार्यरत होता. नोकरीत कायम करावे यासाठी वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र त्यांनी दाद दिली नाही म्हणून तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात धाव घेतली. तक्रारदारास नोकरीत सामावून घ्यावे, असे आदेश खंडपीठाने दिले होते. खंडपीठाच्या आदेशान्वये कायम करण्यात यावे यासाठी पुन्हा रीतसर अर्ज करण्यात आला. त्या अर्जासोबत झेरॉक्सच्या सत्यप्रती जोडल्या होत्या.

महिनाभरापासून रचला होता सापळा
दरम्यान, तक्रारदारास गेल्या काही महिन्यांपासून महासंचालक गोसावी आणि सहसंचालक क्षीरसागर यांच्याकडे नोकरीत कायम करण्यासाठी पाठपुरावा करत असताना त्या अधिकाऱ्यांनी अर्जा सोबत दिलेली कागदपत्र झेरॉक्स आहेत, ते बनावट आहेत, तुला निलंबित करतो, असा दम दिला. निलंबन टाळण्यासाठी आणि नोकरीत कायमस्वरूपी येण्यासाठी त्या अधिकाऱ्यांनी दहा लाख रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक एस. एम. परोपकारी यांच्याकडे तक्रार दिली. गेल्या महिनाभरामध्ये संचालकावर पाच वेळा सापळा रचला मात्र ते दोघे अधिकारी प्रत्येक वेळी जागा बदलत होते. आज शुक्रवारी सायंकाळी महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर या दोघांना त्यांच्या दालनामध्ये १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्या दोघांविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महासंचालकाच्या कामाचे क्षेत्र महाराष्ट्र
वाल्मीचे महासंचालक तथा जलसंधारणाचे आयुक्त हरिभाऊ गोसावी यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य असल्यामुळे तक्रारदारास लाच देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी अमरावती, पुणे, मुंबई येथे बोलावले होते. तक्रारदाराने आई आजारी असल्यामुळे शहर सोडता येत नाही, अशी भूमिका घेतल्यामुळेच तो या सापळ्यात अडकला असल्याचे परोपकारी यांनी सांगितले. गोसावी नुकतेच गेल्या आठवड्यात येऊन गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागावर होता, मात्र ते एका हॉटेलमध्ये थांबून मध्यरात्रीच पुण्याला निघून गेले.

हरिभाऊ गोसावी आणि राजेंद्र क्षीरसागर यांची घरे पुण्यात आहेत. त्या दोघांना लाच घेताना पकडल्यानंतर तातडीने पुणे येथील त्या दोघांच्या घरांवर एकाच वेळी छापा मारून घर झडती सुरू केली. पुण्यासोबत नाशिक आणि सोलापूर येथे देखील त्यांची घरे असल्यामुळे तिथे देखील कारवाई करण्यात येत असल्याचे परोपकारी यांनी सांगितले.

८ लाखांच्या केल्या गड्ड्या
संचालक गोसावी आणि सहसंचालक क्षीरसागर यांना लाच देण्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यासाठी तक्रारदाराने दोन लाख रुपये आणले. त्या अधिकाऱ्यांनी त्या नोटांवर ऍथॉसीन पावडर टाकली. त्यानंतर नोटांच्या आकाराचे पेपर कापून गड्ड्या तयार केल्या आणि त्या गड्ड्यांवर नोटा ठेवल्या होत्या.

महासंचालकांचा कोट्यवधीचा बंगला
वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ गोसावी यांचा शिवाजी नगरात कोट्यवधी रुपयाचा बंगला तर सहसंचालक क्षीरसागरचा बंगला नांदेड सिटी मध्ये आहे. त्या दोन्ही बंगल्याची झडती घेण्यात येत आहे.