इराकमधील सरकारविरोधी आंदोलनात 319 जणांचा मृत्यू

472

गेल्या महिनाभरापासून इराकमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधातील आंदोलनादरम्यान तब्बल 319 जणांचा मृत्यू झाला असून 15 हजारांहून अधिक जखमी झाल्याचे इराकच्या संसदीय मानवाधिकार समितीने म्हटले आहे. भ्रष्टाचार, आर्थिक सुधारणा करण्यात सरकारचे अपयश, कमी होत चाललेल्या नोकरीच्या संधी इत्यादी कारणांवरून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी होत असून सरकारविरोधात आंदोलन तीव्र होत चालले आहे. आंदोलन थोपवण्यासाठी सुरक्षा दलांकडून झालेल्या प्रयत्नांमध्ये शेकडो आंदोलनकर्त्यांना जीव गमवावा लागला तर हजारोजण जखमी झाल्याचे समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

अल खलानी या भागात आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न केला. बगदादमधील बसरा भागात

सुरक्षा दलाच्या जवानांनी नजरचुकीने एका शाळेच्या बसवर अश्रुर्धोराचे गोळे फेकले. यात 23 विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान, इराकचे पंतप्रधान आदिल अब्दुल माहदी यांनी अनेक बाबतीत त्यांचे सरकार का मागे पडले याबाबत त्यांचे मंत्रिमंडळ संशोधन करेल असे शनिवारी म्हटले होते. तसेच काही दिवस आधी त्यांनी राजीनामा देण्याबाबतचे विधानही केले होते. ऑक्टोबरपासून इराकमध्ये हिंसाचार उफाळला असून अनेक भागांत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या