मुसलमानांवर टीका केल्याने शेफची नोकरी गेली

सामना ऑनलाईन। दुबई

देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’वरुन वातावरण तापले असतानाच एका सेलिब्रिटी शेफनेही यात उडी घेतल्याने त्याला नोकरी गमवावी लागली आहे. अतुल कोचर असे त्याचे नाव असून तो दुबईच्या एका प्रसिद्ध हॉटेलचा मुख्य शेफ आहे. ‘क्वांटिको’मालिकेवरुन प्रियांकावर टीका करताना त्याने इस्लामविरोधी ट्विट केलं. यामुळे त्याला नोकरीवरुन काढण्यात आलं आहे.

अतुल कोचर जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस हॉटेलच्या रंग महल रेस्तराँचा मिशिलीअन स्टार शेफ आहे. ‘क्वांटिको’ मालिकेत एक दहशतवादी हिंदुस्थानी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या नावाने ही व्यक्तीरेखा आंतरराष्टरीय परिषदेवर हल्ला करणार असते. असं या मालिकेचे कथानक होते. यावरून अनेकांनी प्रियांकाला लक्ष्य केलं. याबद्दल प्रियांकाने जाहीर माफीही मागितली होती. पण त्यानंतर अतुल यांनी प्रियांकावर सडकून टीका केली व इस्लामविरोधी ट्विट केलं. २००० वर्षांपासून इस्लामच्या दहशतीखाली राहणाऱ्या हिंदूंच्या भावनांचा तू सन्मान केला नाही. तुला याची लाज वाटली पाहिजे. असं ते म्हणाले. त्यानंतर सगळ्यांनी अतुलवर टीका करण्यास सुरूवात केली. अतुलने इस्लामविरोधात टि्वट केल्याने अनेकांनी त्याला नोकरीवरुन काढण्याची मागणी केली होती. यामुळे अतुलला कामावरुन काढण्यात आले आहे.