अमली पदार्थविरोधी कक्षाची शहरात धडक कारवाई, सात ड्रग्जमाफियांकडून कोटय़वधीचा ड्रग्ज जप्त

प्रातिनिधिक फोटो

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकांनी शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाया केल्या. पोलिसांनी यशस्वी कारवाया करीत अडीच कोटी रुपये किमतीचा ड्रग्जचा साठा जप्त केला. तर सात ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या.

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने अंधेरी पूर्वेकडील वासुदेव चेंबर्ससमोर डोंगरी येथे राहणाऱया एका ड्रग्जमाफियाला पकडले. त्या ठिकाणी एक पेडलर मोठय़ा प्रमाणात एमडीचा साठा विकण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार वांद्रे युनिटने त्या ठिकाणी सापळा रचून मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईत ड्रग्जची विक्री करणाऱया अन्वर इक्बाल सय्यद (41) या ड्रग्जमाफियाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे एक कोटी दोन लाख रुपये किमतीचा तब्बल 510 ग्रॅम वजनाचा एमडी साठा सापडला. तर आझाद मैदान युनिटने वाडीबंदर परिसरात धडक कारवाई केली. आझाद मैदान युनिट वाडीबंदर परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक नायजेरियन व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 39 लाख 90 हजार किमतीचा 132 ग्रॅम कोकेनचा साठा मिळाला. इफॅनी चिक्वू पायूस (29) असे त्याचे नाव असून तो नालासोपारा येथे राहतो.

दरम्यान, मस्जिद बंदर येथे एमडीचा साठा विकण्यासाठी आलेल्या तिघा ड्रग्जमाफियांना घाटकोपर युनिटने एमडीच्या साठय़ासह रंगेहाथ पकडले. मुद्दसर कासिम शेख (24), शाहनूर हमीद पटेल (30) आणि उके चुक्यू अशा तिघांना एमडीसह रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे पोलिसांना 81 लाख 75 हजार किमतीचा 545 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा मिळाला. तर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने एका महिलेसह अन्य ड्रग्जतस्कराला पकडून अडीच लाखांचा 12 किलो गांजा जप्त केला. खुशाल डोंगरे असे त्याचे नाव असून महिला ड्रग्जतस्कर बिल्कीस मोहम्मद सुलेमान शेख हिच्या घरातून पोलिसांना दोन लाख 37 हजारांची रोकड मिळाली.

आपली प्रतिक्रिया द्या