पाकिस्तानात शिया समुदायाविरोधात रॅली; हजारोंच्या संख्येने सुन्नी नागरिकांचा सहभाग

पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या शिया समुदायाचा विरोध तीव्र होत आहे. शिया समुदायवर ईशनिंदेचा आरोप करत कराचीमध्ये तहरीक- ए-लबाइक पाकिस्तान (टीएलपी) आणि अहल एसुन्नत वल जमातने (एएसडब्लूजे) शिया समुदायाविरोधात रॅली काढली. त्यात हजारोंच्या संख्येने सुन्नी समुदायातील नागरिक सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान ‘शिया काफीर है’ अशी नारेबाजी करण्यात आली. जियारत ए आशुराचे पठण करण्यावरून शिया समुदायावर ईशनिंदेचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मोहर्रमच्या मिरवणुकीवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

पाकिस्तानात शिया समुदाय अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या 20 टक्के आहे. अहले-सुन्नत वल जमात, लश्कर-ए-जंघवी, सिपह-ए-सहावा पाकिस्तान या सुन्नी कट्टरवादी संघटनांकडूनन शिया समुदायावर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिया समुदायाविरोधात द्वेष आणि हिंसाचार वाढत आहे. इमामिया लाइन्स परिसरात इमामवाडामध्ये शिया समुदायावर कट्टरवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. रॅलीत सहभागी झालेल्या निदर्शकांच्या हातात दहशतवादी संघटना एएसडब्लूजे आणि एसएसपीचे बॅनरही होते. या संघटना पाकिस्तानात शियाद्वेष पसरवत असून शियांच्या हत्याकांडाला जबाबदार आहेत. पाकिस्तानात मोहर्रमपासूनच शिया समुदायाविरोधात निदर्शनांना सुरुवात झाली आहे. जियारत ए आशुराचे पठण करण्यावरून शिया समुदायावर ईशनिंदेचा आरोप करण्यात येतो. जियारत ए आशुरामध्ये इमाम हुसैन यांची हत्या करणाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतो. प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्या सहकाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे शिया समुदायातील काही नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानात महिन्याभरात ईशनिंदेचे 42 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील सर्वाधिक गुन्हे शिया समुदायाविरोधात आहेत. प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्या सहकाऱ्यांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहमदिया समुदाय आणि ख्रिश्चन समुदायाच्या काही लोकांवरही ईशनिंदेचा आरोप ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानात ईशनिंदेच्या मुद्द्यावरून मॉब लिचिंग, हत्या आणि निदर्शने होत असतात. अल्पसंख्याकांविरोधात ईशनिंदेच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत पाकिस्तानातील मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी घाईगडबडीत गुन्हे दाखल करू नये. प्रकरणाची खातरजमा करावी. अशा घटनांची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना मानवाधिकार आयोगाने केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या