अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे आनंदाची बाबः डॉ. येळीकर

1328

कोरोनाची टेस्ट आली तर भिती वाटते, मात्र अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आनंदाची बाब आहे. त्यामुळे सहा दिवस 115 वार्डात चालणाऱ्या या सिरो सर्वेक्षणात नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊ चाचणी करून सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी केले. त्या महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एमजीएम आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी आयोजित सिरो सर्वेक्षणाचा प्रारंभ करतांना तापडिया कासलीवाल मैदानावर सोमवारी बोलत होत्या.

डॉ. येळीकर यांनी सांगितले की, शहरात वार्डनिहाय हे सर्वेक्षण होणार असून ज्याठिकाणी जास्त लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या असतील त्याठिकाणी प्रतिकारशक्ती वाढलेली असते. कोरोना काळात अँटीबॉडी अशी टेस्ट आहे की जी पॉझिटिव्ह आल्यावर लोकांनी आनंद साजरा करायला हवा.

आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले, की आजपासून शहरातील 115 वॉर्डांमध्ये ‘सिरो सर्वेक्षण’ अँटी बॉडी टेस्टची सुरुवात करण्यात आली आहे. शहरात 10 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील 115 वार्ड मध्ये ‘सिरो सर्वेक्षण’ करण्यात येणार आहे. हे काम महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय  यांनी हाती घेतले. कोरोना नियंत्रणासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल केंद्र स्तरावरही घेण्यात आली. आता ‘सिरो सर्वेक्षण’ सुरु करून दिल्ली, मुंबईनंतर संभाजीनगर महापालिकेने बाजी मारली. या मोहिमेत प्रत्येक वार्डमधून किमान 35 ते 40 जणांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील. यातून अँटी बॉडी तयार झाल्या आहेत का याची तपासणी केली जाईल. 6 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत 20 पथके आहेत.

एक पथकातील संख्या लक्षात घेता या मोहिमेत सलग 6 दिवस 20 डॉक्टर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 20 डॉक्टर हे एमजीएम महाविद्यालयातील असणार आहेत. या सर्वेक्षणात प्रत्येक वार्डातील लोकसंख्या लक्षात घेऊन चिठ्या टाकून त्या भागाची निवड करण्यात आली आहे. हे रँडम सॅमपल सर्वे होणार आहे. यात प्रत्येकी 10 घरानंतर  एका घरातील  एका व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात येणार असून या कुटुंबातील लोकांच्या शरीरातील अँटी बॉडी तपासल्या जाणार आहेत. या टेस्टमुळे त्या व्यक्तीला व त्या भागातील इतर किती नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, हे कळेल. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे यात कोणत्याही नागरिकास कोरोटाईन किंवा आयसोलेट केले जाणार नाही. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि या सिरो सर्वेक्षणसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले आहे.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, डॉ. शोभा साळवे, डॉ. श्वेता देशमुख, डॉ. अमरीन, डॉ. स्मिता अंदूरकर, डॉ. जगन्नाथ दिक्षित, डॉ. सेवलीकर, डॉ. पठाण, डॉ. सिद्धार्थ बनसोड, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प समन्वयक ॲड. गौतम संचेती, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रविण पारख, पारस जैन, मराठवाडा विभागीय अध्यक्ष पारस चोरडीया, जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी, अनिल संचेती, राहुल झांबड, प्रफुल श्रीश्रीमाळ, प्रकाश कोचेटा, अमित काला, अभिजित हिरप आणि अमित भोसेकर यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या