रोरोतून मांडव्याला येणाऱ्या पर्यटकांची होणार अँटीजन टेस्‍ट

लॉकडाऊनचे निर्बंध थोडे शिथील केल्यानंतर पर्यटनस्थळी पर्यटकांनी पुन्हा गर्दी करायला सुरुवात केली आहे. मुंबईपासून जवळ असलेले अलिबाग हे पर्यटकांचे पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. इथे गर्दी वाढून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. रो रो बोटसेवेमुळे मुंबईहून पर्यटकांना वाहनासकट अलिबागला जलदगतीने येता येऊ लागले आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेने मांडव्याला रो रो बोटीतून उतरणाऱ्या पर्यटकांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हा परीषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांची एकत्रित ऑनलाइन बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी बाबत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गटविकास अधिकारी, स्थानिक पोलीस, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करावे अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केली आहे.

मुंबई ते मांडवा दरम्यान रोरो बोटसेवा सुरू आहे. या मार्गावरुन दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक ये जा करतात. या जलमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मांडवा येथे अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे. याबाबत रो रो सेवा चालविणाऱ्या कंपनीचे अधिकारी व मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. ज्या प्रवाशांकडे 48 तासांच्या आतील RTPCR रिपोर्ट नसेल अशा प्रवाशांची आरोग्य विभागाकडून अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे.

ज्या गावांमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत त्या गावांमध्ये गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासनाने अँटीजन चाचणी शिबीर‌ राबवावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी या शिबिरस्थळी आपले कर्मचारी नेमून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. गर्दीचे समारंभ, बंदी असतानाही सुरू असलेली दुकाने, शासनाने सुचविलेल्या निर्बंधांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनामार्फत कारवाई केली जाणार असल्याचंही या बैठकीत हजर असलेल्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या