आषाढी स्पेशल – निरपेक्ष सेवेची माऊली…अनु मावशी!

>> नमिता वारणकर

दररोज पहाटे पांडुरंगाला उठवण्यासाठी त्याची काकड आरती केली जाते. काकड आरतीपूर्वी विठ्ठलाला उठवणे, त्याचे मुखप्रक्षालन करणे, स्नान घालणे, वस्त्र नेसवणे, दृष्ट काढणे, नैवेद्य दाखवणे , घास भरवणे…या प्रत्येक छोट्या-छोट्या कृती करत असताना अभंग म्हणत, त्याच्या लीलांचे वर्णन करत संपूर्ण मंदिर परिसरात निरपेक्ष भावाने गेली 25 वर्षे रांगोळी काढण्याची सेवा करणा-या अनुसया फसलकर अर्थात अनु मावशी!

पहाटे तीन-साडेतीनची वेळ..मनुष्य, पक्षी, किटक, पाने, फुलझाडे सारी अवघी सृष्टी गाढ झोपेतच आहे…त्यामुळे पक्ष्यांची किलबिल नाही. पानांची सळसळ नाही की मनुष्याची वर्दळ नाही. अशावेळी सूर्योदय होण्यापूर्वीच्या वातावरणात पंढरपुरात पांडुरंगाला उठवण्यासाठी मात्र लगबग सुरू असते ती पुजारी आणि सेवेकऱ्यांची. मंदिराजवळील परिसरात अगदी निरामय शांतता पसरलेली असते. मंदिरात आणि मंदिराबाहेरील सेवा शांतपणे सुरू असतात. काकड आरती पाहण्यासाठी काही भक्तगण रुक्मिणी मंदिराजवळील प्रवेशद्वारासमोर मध्यरात्री तीन वाजता रांगेत उभे असतात. नुकताच काही महिन्यांपूर्वी काकड आरतीला जाण्याचा योग आला. तेव्हा माझे लक्ष वेधून घेतले ते शांतपणे रांगोळीची सेवा करणाऱ्या अनु मावशी यांनी.

अनु मावशी रुक्मिणी मंदिराच्या प्रवेशद्वाराचा उंबरा, त्याच्या आजूबाजूचा परिसर झाडत होत्या, पुसत होत्या. त्या जागी स्वस्तिक, चक्र, कमळ, गोपद्म अशा पारंपरिक रांगोळ्या काढत होत्या. त्यांच्याशी त्यांच्या या सेवेबाबत संवाद साधला असता त्या म्हणाल्या, गेल्या 25 वर्षांपासून मी ही सेवा करत आहे. याकरिता दररोज नियमित पहाटे तीन ते साडेतीनदरम्यान नेमाने मंदिरात येते. विठ्ठल मंदिर परिसरातील गणपती मंदिर, कोन्होपात्रेचे मंदिर, चोखामेळा, नामदेव पायरी, गोपाळकृष्ण, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल गाभारा, मारुती मंदिर, सत्यभामा मंदिर, दक्षिण दार, प्रल्हाद महाराजांचं मंदिर असा प्रत्येक मंदिर परिसर, उंबरठा, अंगण, देवघर या सगळ्या ठिकाणी रांगोळी काढते. विठ्ठल गाभारा ते संपूर्ण मंदिर परिसरात रांगोळी काढेपर्यंत साडेआठ वाजतात. पारंपरिक रांगोळ्या, देवतांची सात्त्विक चिन्ह असणा-या मन प्रसन्न करणा-या रांगोळ्या विठ्ठल मंदिरात सर्व ठिकाणी पाहायला मिळतात.

प्रत्यक्ष पांडुरंगाची काकड आरती होण्यापूर्वीची पूजा पाहताना अभंग ऐकायला आले. कुतुहल म्हणून त्या आवाजाचा मागोवा घेतला तर पुन्हा एकदा दिसल्या अनु मावशी. रांगोळी काढत त्या अभंग म्हणत होत्या.. अभंगातला प्रत्येक शब्द मनाला आणि देहाला शांत करत होता, अंतर्मुख करत होता. ही अभंग म्हणण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली असे विचारल्यावर त्या  सांगतात, “माझी आई घुंगराची काठी हातात घेऊन मंदिरात रांगोळी काढायला येत असे. रांगोळी काढताना ती विठ्ठलाकरिता प्रेमाने अभंग म्हणायची. हे सारे अभंग माझ्या आईने रचलेले आहेत. कलावती सदाशिव आदटराव हे माझ्या आईचं नाव. तिच्याकडून हे अभंग म्हणायला शिकले. ती म्हणत असताना ते ऐकून ऐकून पाठ केले. यामध्ये पांडुरंगाला उठवणं, त्याचं मुखप्रक्षालन करणं, त्याला अंघोळ घालणं, वस्त्र नेसवणं, त्याला न्याहारी भरवणे, दृष्ट काढणे असे अनेक अभंग आहेत.”

‘ही माझ्या आईची सेवा आहे. जेव्हा माझी आई मला रांगोळी काढायला शिकवायची तेव्हा मला मंदिरात यायचा आणि त्यासाठी लवकर उठायचा कंटाळा यायचा. तरीही लहान असताना आईबरोबर देवळात यायचे. पंढरपुरातल्या दत्तघाटात सातवीपर्यंत शाळा शिकले. सातवीची परीक्षा झाल्यावर लग्न झालं. मुलं झाली. मालक वारले. मुलगा वारला त्यानंतर मी पुन्हा आईकडे राहू लागले. रांगोळी काढण्याची सेवा करण्यासाठी मंदिरात येऊ लागले. मला आपसूकच ही. आवड निर्माण झाली, अशी स्वत:विषयीची माहिती अनुसया फसलकर देतात.

पांडुरंग मंदिरात घेऊन येतो…

गेल्या पंचवीस वर्षांपासून विठ्ठल मंदिरात रांगोळी काढणे आणि अभंग म्हणण्याची सेवा निरपेक्ष भावाने करता. काय अनुभव आला..असे विचारल्यावर त्यांचे मन कृतज्ञतेने भरून येते. त्या म्हणतात, माझं घर साडेतीन किलोमीटर अंतरावर नदीच्या कडेजवळील गावात आहे. त्या परिसरात खूप कुत्री आहेत. मंदिरात येण्याकरिता रात्री अडीच दोनपर्यंत मला घरातून बाहेर पडावे लागते. त्याकरिता मी रात्री एक वाजता उठते. दिवसभर दोन घरची घरकामं करून रात्री एक वाजताही तोच मला उठवतो. त्यानंतर अंघोळ वगैरे माझी वैयक्तिक कामं आटोपून रात्री दोन-अडीच वाजता मंदिरात येण्यासाठी निघते. तिथून मला पांडुरंगच मंदिरात आणतो, कारण आजतागायत एकाही कुत्र्याने माझ्यावर कधीही हल्ला केला नाही. कधी कधी रस्त्यावरचे दिवे जातात. तेव्हा मी काळोतूनच चालत देवळात येते. तरीही मला सुरक्षित वाटतं. कारण तो पांडुरंग माझ्या सोबत असतो. तोच मला घेऊन मंदिरात येतो.

आपली प्रतिक्रिया द्या