पुतळ्यांची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करू – अमित शहा

amit-shah

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

त्रिपुरा व तामिळनाडूत पुतळ्यांची तोडफोड कऱण्यात आल्याने देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमागे भाजप नेत्यांचाच हात असल्याचा आरोप होत आहे. याची गंभीर दखल भाजप नेतृत्वाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर पुतळ्यांची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी तंबीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलीय. शहा यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना हा इशारा दिलाय.

त्रिपुरात डाव्यांचा पराभव झाल्यानंतर सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी बेलोनियामधील लेनिनचा पुतळा उखडून टाकला. यावरून सर्वत्र खळबळ उडालेली असतानाच मंगळवारी तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही घटनांनतर भाजपवर चहूबाजूने टीका होत आहे. भाजप सत्तेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या सगळ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता शहा यांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांना धारेवर घेतले असून पुतळ्यांची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.