आवडीला वयाचे बंधन नसते

ज्येष्ठपण म्हणजे नव्याने आयुष्य भरभरून जगायचं. सगळय़ा जबाबदाऱ्या पार पाडल्यात. मग आता राहून गेलेली अभिनयाची आवड पूर्ण करा.

लहानपणी नाटकात काम केलेले… त्यानंतर अभिनयाची आवड असूनही कधी रंगभूमीची पायरी चढली गेली नाही. शिक्षण, नोकरी, सांसारिक जबाबदाऱया यात स्वतःच्या आवडीनिवडींकडे, छंदांकडे कधी लक्षच दिले नाही. किंबहुना देता आले नाही. आता थोडे निवांतपण आले. मुलं मार्गी लागली. आर्थिक स्थैर्य आले… आणि मुख्य म्हणजे हाती भरपूर वेळ उरू लागला. चला मग या निवांतपणाचा सदुपयोग करूया. राहून गेलेले छंद पूर्ण करूया.

रमा श्रीनिवासन… गेल्या तीन चार वर्षांत जाहिरात विश्वात गाजलेलं नाव… वय वर्ष ६४. तीनेक वर्षांपूर्वीच त्या शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्या. दुबईत त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. निवृत्तीनंतर त्या बंगळुरूला परतल्या. पतीसोबत शांतपणे उर्वरीत आयुष्य जगू असं त्यांनी ठरवलं होतं. पण येथे त्यांच्या नशिबात नेमकं काय काढून ठेवलं होतं त्याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती. बंगळुरूला त्यांच्या जावयाच्या मित्राने त्यांना जाहिरातीत काम करायची ऑफर दिली. दोनच सीन्स होते. पण आत्ता… साठी पार केल्यावर मॉडेलिंग… छे… असा विचार त्यांच्या मनात आलाही… पण मुळातच आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याची त्यांची वृत्ती… त्यांनी बेधडक ते काम स्वीकारलं.

याबाबत आठवण सांगताना रमा श्रीनिवासन म्हणाल्या, आतापर्यंत फोटोसाठी उभी राहिले होते, पण जाहिरातीसाठी कॅमेरा सुरू झाला आणि माझ्या तोंडून शब्दच फुटेना… गप्प एकदम… जाहिरात लग्न जुळवणाऱ्या एका वेबसाईटची होती. मी त्यात मुलीची आई म्हणून दिसणार होते. समोर कॅमेरा… लख्ख प्रकाश… आजूबाजूला २५-३० माणसं… सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे… काय प्रसंग होता… आता आठवलं तरी हसू येतं. येथे एक बरं असतं… तुम्हाला वयानुसारच रोल करायला मिळतात.

निवृत्तीनंतर नुसतं बसून राहण्यापेक्षा आता अनेक ज्येष्ठ नागरीक वेगवेगळे पर्याय शोधायला लागले आहेत. ऍक्टींग हाही त्यातलाच एक पर्याय ठरू पाहतोय. आयुष्यभर दुसरे काम करताना मनात अभिनेता होण्याचं अपूर्ण राहिलेलं काम निवृत्तीनंतर काहीजण मनमुराद पूर्ण करून घेत आहेत. पण काहीजणांना अजूनही ते शक्य होत नाहीय… का… तर ऑक्टिंग करायची हे ठरकलं, पण नेमकं काय करायचं? कुणाला भेटायचं? काम मिळवायचं कसं? हे प्रश्न त्यांच्यापुढे असतात. पण खास आजी-आजोबांच्या भूमिका त्यांना सहज मिळू शकतात. उन्हाळ्यात अनेक अभिनय शिबिरं सुरू होतात. त्यात ज्येष्ठांनीही भाग घेऊन अभिनयाची आपली आकड जोपासली तर काय हरकत आहे?

येथे संपर्क साधू शकता
शानू शर्मा – रणवीर सिंह, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, स्वरा भास्कर, भूमी पेडणेकर यांना बॉलीवूडमध्ये आणण्यात या शानू शर्मांचा हात आहे. यशराज बॅनरमध्ये त्या कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करतात. ‘धूम-३’, ‘जब तक है जान’, ‘एक था टायगर’, ‘माय नेम इज खान’, ‘बॅण्ड बाजा बारात’ या सिनेमांचे कास्टिंग त्यांनी केलं आहे. संपर्क : [email protected]

मुकेश छाबरा – राजकुमार राव, सुशांतसिंह राजपूत आणि अमित साध या अभिनेत्यांना बॉलीवूडमध्ये आणण्याचे काम मुकेश छाबरा यांनी केलंय. ‘गँग्स ऑफ वासेपूर’मुळे ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर आमीर खानच्या ‘दंगल’ या सिनेमाचे कास्टिंगही त्यांनीच केलं आहे. संपर्क : [email protected]

श्रुती महाजन – ‘चक्रव्यूह’, ‘रामलीला’, ‘मेरी कोम’ आणि ‘फाइंडिंग फॅनी’ असे काही चित्रपट श्रुती महाजन यांनी कास्ट केले आहेत. अगदी अलिकडे त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’, ‘गंगाजल-२’ हे सिनेमेही कास्ट केले.
संपर्क ः [email protected]

अतुल मोंगिया – मुळात सिनेमाची निर्मिती करण्याची आवड असलेले अतुल मोंगिया कास्टींग डायरक्टर म्हणून काम करू लागले आहेत. ‘लव्ह सेक्स और धोका’ या सिनेमातील फ्रेश कास्टिंग त्यांनी केली आहे. संपर्क : [email protected]

हनी त्रेहान – राजधानी दिल्लीत रंगभूमीवरून हनी त्रेहान नंतर तेथेच स्टेज डायरेक्टर झाले. मग त्यांना विशाल भारद्वाज भेटले. मग त्यांचा ‘मकडी’, ‘मकबूल’, ‘ओमकारा’ आणि ‘कमिने’ या सिनेमांचे कास्टिंग त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या