झुरळाच्या पोटातील माती विकायला काढली, किंमत फक्त 3 कोटी 12 लाख रुपये

अमेरिकेतील लोकं कशाचा लिलाव करतील आणि त्यासाठी किती पैसे मोजतील याचा नेम नाही. ताज्या माहितीनुसार आर.आर. ऑक्शन या लिलाव करणाऱ्या कंपनीने झुरळांच्या पोटातील माती विकायला काढली आहे. या मातीची किंमत 3 कोटी 12 लाख 57 हजार 400 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. एवढे पैसे दिलेत की तुम्हाला चिमटीत मावेल इतकी माती मिळेल. असं काय आहे या मातीमध्ये ज्यासाठी भलीमोठी रक्कम ठेवण्यात आली आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

1969 साली नासाने त्यांचे अंतराळवीर चंद्रावर पाठवले होते. परत येत असताना या अंतराळवीरांनी जवळपास 22 किलो वजनाचा दगड चंद्रावरून आणला होता. चंद्रावरून पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. परग्रहावरून त्यांच्यासोबत जीवाणू किंवा जंतू आले असल्याची भीती असल्याने त्यांचे विलगीकरण करण्यात आले होते. या काळात मासे, उंदीर आणि झुरळं चंद्रावरून आणलेल्या दगडाच्या संपर्कात आणण्यात आले होते. कालांतराने चंद्रावरून आलेल्या माणसांना कोणताही संसर्ग झाला नसल्याचं निष्पन्न झालं सोबतच चंद्रावरून आणलेल्या दगडाच्या संपर्कात आणण्यात आलेल्या मासे, उंदीर आणि झुरळं यांच्यावरही विपरीत परिणाम दिसून आला नव्हता. संशोधकांनी सेंट पॉल विद्यापीठातील कीटकविज्ञानतज्ज्ञ मारिओन ब्रुक्स यांना चंद्रावरून आणलेल्या दगडाच्या सान्निध्यात नेलेल्या झुरळाचं संशोधन करण्यासाठी बोलावलं होतं. या संशोधनाअंती चंद्रावरील माती ही धोकादायक किंवा विषारी घटक असलेली नाही हे सिद्ध झालं होतं. याच मातीचा किंचितसा अंश हा विक्रीसाठी काढण्यात आला आहे. यामुळेच या मातीची किंमत इतकी जास्त आहे.