स्टीव्ह जॉब्स यांच्या नोकरीच्या अर्जाची अडीच कोटींना विक्री!

अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी वापरलेल्या वस्तूंचा कोटय़वधी रुपयांना लिलाव होत आहे. नुकताच स्टीव्ह जॉब्स यांनी 1973 साली म्हणजेच वयाच्या 18व्या वर्षी नोकरीसाठी केलेल्या अर्जाची 34 हजार 300 डॉलर्स अर्थात अडीच कोटी रुपयांना विक्री झाली आहे. त्या वेळी जॉब मिळविण्यासाठी त्यांनी हा अर्ज आपल्या हाताने लिहिला होता. विशेष म्हणजे ज्या अर्जाचा लिलाव झाला तो एकमेव अर्जच आपल्या आयुष्यात स्टीव्ह जॉब्स यांनी केला होता.

जॉब्स यांच्या या नोकरीच्या अर्जाचा चौथ्यांदा लिलाव करण्यात आला आहे. याआधी 2017मध्ये 18,750 डॉलर्स, 2018मध्ये 1,74,757 डॉलर्स आणि मार्चमध्ये 2,22,400 डॉलर्समध्ये त्याचा लिलाव करण्यात आला होता. यंदाचा लिलाव मात्र काहीसा वेगळा होता. जॉब्स यांच्या लेखी अर्ज आणि डिजिटल व्हर्जन सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. याचे कारण म्हणजे त्यांच्या फिजिकल अर्जाला जास्त किंमत मिळतेय की डिजिटल हे आयोजकांना बघायचे होते. लोकांना स्टीव्ह जॉब्स यांनी स्वतः लिहिलेल्या अर्जामध्ये जास्त रस असल्याचे पाहायला मिळाले.

जॉब्स यांनी या अर्जात नाव, पत्ता, फोन भाषा, ड्रायव्हिंग लायसन्स आणि स्पेशल एबिलिटीजची माहिती दिली होती. अर्ज चांगल्या स्थितीत असल्याचादेखील लिलावात उल्लेख करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या