विजयदुर्गचा ठेवा सुरक्षित करण्यासाठी योग्य ती डागडुजी करणार; पुरात्त्व विभागाच्या शुभण मुजूमदार यांचे आश्वासन

विजयदुर्ग किल्ल्यातील गोमुख दरवाजा, खलबतखाना, टेहळणी बुरुज, धान्य कोठार, सदर, घोड्याची पागा तसेच अत्यंत बिकट अवस्थेत असलेले गणेश बुरुज, हनुमंत बुरुज, नगारखाना, भवानी मंदिर, मुख्य तलावासह किल्ल्यातील सर्व विहीरी यांची सखोल पाहणी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे मुंबई येथील अधीक्षक शुभम मुजुमदार यांनी केली. यावेळी किल्ल्याच्या तटबंदीवर वाढणारी झाडांची मुळे यांची तातडीने दखल घेत तोफा, तोफगोळे यांना अत्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आश्वासन मुजुमदार यांनी दिले.

शुभम मुजुमदार यांनी नुकतीच विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत ए. व्ही. नागनूर, डी. सी. दास, राजन दिवेकर आदी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम, संचालक प्रदीप साखरकर आणि यशपाल जैतापकर तसेच किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि सल्लागार राजीव परुळेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुजुमदार यांनी संपूर्ण किल्ल्याची सुरूवातीला होडीने जाऊन बहिर्गत पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण किल्ला आतील बाजूने फिरून यशपाल जैतापकर यांच्याकडून इत्थंभूत माहिती घेतली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेले व ढासळत चाललेले बुरुज वाचविण्यासाठी तसेच त्यांची डागडुजी करण्यासाठी लवकरच तातडीने पावले उचलली जातील अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे उत्साही संचालक यांनी त्यांचं केलेलं अनपेक्षित स्वागत अनुभवताना सर्वच अधिकारी भारावून गेले. एक सामाजिक संस्था म्हणून किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे ज्या ज्या वेळी आम्हाला सहकार्य लाभेल त्या त्या वेळी आम्ही आपला नक्कीच सल्ला घेऊ, असं यावेळी मुजुमदार यांनी समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांना सांगितले.