झोपाळ्यावर बसण्यावरून वाद अल्पवयीन मुलांनी केले चाकूचे वार

कल्याणच्या भगवा तलाव परिसरात रक्तरंजित राडा झाला आहे. तेथील झोपाळ्यावर बसण्यावरून दोन गटांत वाद झाला असून तो इतका विकोपाला गेला की, अल्पवयीन मुलांनी चाकूचे सपासप वार केले. या भीषण घटनेमध्ये तीन मुले गंभीर जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भगवा तलाव येथे लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळा, घसरगुंडी अशी अनेक साधने आहेत. सध्या मे महिन्याची सुट्टी असल्याने तेथे खेळण्यासाठी बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याच भागातील एक तरुण आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी गेला होता. भगवा तलाव परिसरातील उद्यानात झोपाळ्यावर बसण्यावरून काही अल्पवयीन मुलांनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर या मुलांनी त्याला तलावाच्या मुख्य गेटवर गाठले व त्याच्यासोबत असलेल्या दोघांना शिवीगाळ करत हाणामारी करण्यास सुरुवात केली.

काही क्षणातच दोन्ही गटांत जोरदार राडा झाला. याचदरम्यान अल्पवयीन मुलांनी बांबू व चाकूने त्या मुलावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोघांवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात सदर मुलगा व त्याचे दोन नातेवाईक जखमी झाले असून त्या तिघांवर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींनुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हे दाखल करत काही जणांना ताब्यात घेतले आहे.