नसीम खान काँग्रेस कार्यकारी समितीवर, बॅरिस्टर अंतुलेंनंतर महाराष्ट्रातील अल्पसंख्याक नेत्याला प्रथमच मिळाला मान

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षामध्ये केंद्रीय कार्यकारी समिती ही अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते. बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्यानंतर ही जबाबदारी मिळालेले नसीम खान हे महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील पहिले नेते आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचीही काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नसीम खान यांच्या जागी प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सईद मुजफ्फर हुसैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नसीम खान यांनी कार्यकारी समिती सदस्यपदी नियुक्ती केल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. त्यासंदर्भात एक्सवर त्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे. काँग्रेस पक्षाची मूल्ये आणि तत्त्वे जपतानाच पक्षाचे ध्येय पुढे नेण्यासाठी, देशातील लोकांच्या भल्यासाठी योगदान देण्यासाठी अथक काम करेन असे वचन देतो, असे त्यांनी म्हटले आहे.