न्यूयॉर्क पोलिसांची कहाणी

डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा

२३ वर्षांचा बॉबी फरीद हदीद हा अल्जेरियाचा नाविक अधिकारी होता. त्याला एकदा रेल्वे स्टेशनजवळ सार्वजनिक फोन मोडलेला दिसला. तो हुशार होता. त्याला समजले की, या फोनवरून या क्षणाला जगात कुठेही विनामूल्य कॉल करता येतो. त्याने अमेरिकेचा कोड नंबर फिरवला आणि नंतर मनाला येतील तसे नंबर्स फिरवले. एक हेशियन (हेतीया बेटावरची) काळय़ा मुलीचा तो नंबर होता. हमीद म्हणाला, हॅलो अमेरिका, दोघांत संभाषण सुरू झाले. मुलगी मनमोकळ्या स्वभावाची होती. तिला अनोळखी, परदेशी माणसाशी बोलण्यातच ‘थ्रिल’ वाटत होते. हदीद बोटीवरील नोकरीमुळे जगभर फिरायचा. असेल तेथून शीला जेन या त्याच्या टेलिफोन मैत्रिणीला शुभेच्छा कार्डे पाठवायचा व तिच्या संपर्कात राहायचा. असे चार वर्षे चालले. हदीदला इंग्लिश येत नव्हते, पण शीला जेनचे फ्रेंच उत्तम होते. अल्जेरिया ही एकेकाळची फ्रान्सची वसाहत होती. त्यामुळे दोघांचे छान जमले.

साल १९९४. हदीदला अमेरिकेला जाण्याचे डोहाळे लागले. व्हिसा मिळाला. तो शीला जेनच्या आईवडिलांना भेटला. तिनेच त्याला स्पॉन्सर केला होता. दोघांनी महिनाभरात विवाहसुद्धा केला. शीला जेन ही कॅथलिक असली तरी नवऱ्याच्या धर्माबद्दल आणखी माहिती जाणून घेण्याच्या हेतूने तिने कुराणही वाचण्यास सुरुवात केली. त्याने हातगाडीवर हॉट डॉग्ज विकायला सुरुवात केली. मग कॉपी मशीन्स दुरुस्त करण्याचे शिक्षणही घेतले. फावल्या वेळात टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही तो काम करत होता आणि तो काळाकुट्ट दिवस उजाडला. ११ सप्टेंबर २००१. दोन व्यापारी मनोरे, त्यामध्ये मुस्लिम आतंकवाद्यांनी विमाने घुसवून उद्ध्वस्त केले. तीन हजार निरपराध अमेरिकन्सना त्यांचे प्राण गमवावे लागले. एव्हाना हदीद हा पुरा अमेरिकन बनला होता. त्या सुंदर देशाचे रक्षण करणे हे त्याला महत्त्वाचे वाटत होते. त्याने न्यूयॉर्कच्या पोलीस खात्याशी संपर्क साधला. त्यांना अरेबिक भाषा बोलू शकणारे व समजणारे लोक हवेच होते. हदीदला नोकरी मिळाली, जुलै २००२ मध्ये; पण त्याची पत्नी समाधानी नव्हती. हे निष्कारण स्वतःवर आपत्ती ओढवून घेण्यासारखे आहे असे तिचे मत होते. त्याचे मित्रही पोलिसांना अल्पसंख्याकांचा तिटकारा असतो वगैरे इशारे देत होते. हदीदने त्यांना उत्तर दिले. या देशात तुम्हाला पार्किंग तिकीट मिळालं तर त्याविरुद्ध तुम्ही पोलिसाच्या विरुद्ध न्यायाधीशासमोर आपली बाजू मांडू शकता. ही खरी लोकशाही व ती मी बळकट करणारच.

२००५ मध्ये हदीदचा गौरव केला गेला; कारण फ्रेंच आणि अरेबिक भाषांवर त्याचे कमालीचे प्रभुत्व होते. पुढल्या वर्षी त्याने बेकायदा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे भांडे फोडले. २५ जपानी मुलींना एका मॅडमने कोंडून शरीरविक्रय करण्यास भाग पाडले होते. हदीदला बढत्या मिळत गेल्या. तो काही कट्टर धार्मिक वृत्तीचा नव्हता. पण लंच ब्रेकला नमाज पढण्याचे कधी टाळत नव्हता. त्याच्या बहिणीही नवमतवादी असल्याने बुरखा वगैरे घालत नसत. पण शीला जेन, त्याच्या पत्नीने इस्लाममध्ये खूप रस घेतला होता. ती डोक्यावर हिजाबही बांधायची! त्यांची तिन्ही मुले रविवारी इस्लामिक शाळेत जायची. आता हदीद पोलीस खात्यात मुरला होता. पाच वर्षांचा अनुभव पदरी होता. त्याच्यावर एक केस सोपवली गेली. बुकलेनमध्ये एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे प्रेत कचरापेटीत सापडले होते. त्याचा तपास लागत नव्हता. हदीद दोन गुप्तहेरांबरोबर फ्रान्सला गेला. त्याने खून झालेल्या माणसाची गर्लफ्रेंड शोधून काढली. तिला वेटर मादक द्रव्ये देत होता म्हणून चिडून त्याचा माझ्या भावाने खून केला, असा कबुलीजबाब मिळवल्यावर हदीदचा भाव वधारला. त्याला बुकलेन ऍटर्नी ऑफिसचे प्रशस्तीपत्रक मिळाले. त्याचा उत्कर्ष होण्याआड त्याचा धर्म आड आला नाही. त्याच्या कामाचा दर्जा त्याला वरच्या जागा देत गेला.

इस्लामिक दहशतवाद्याचा नायनाट करण्याकरता न्यूयॉर्कमध्ये एक खास पथक उभारले होते. त्यात हदीदला घेतले गेले, कारण पोलिसांना मशिदीत चालणाऱ्या विषारी प्रचाराचा छडा लावायचा होता. हदीद ज्या मशिदीत नमाजासाठी जात असे, त्यावर संशयिताचा अड्डा म्हणून पोलिसांची नजर होती. आपल्या ऑफिसमध्ये हदीदने जेरुसलेममधील मशिदीचा फोटो लावला होता. महंमद, दारुद, अकबर, हुसेन ही नावे अपवित्र होती. ते सर्व कट्टरपंथीय असल्याचे पोलिसांचे ठाम मत होते. गाडीने चुकीचा टर्न घेतला व ड्रायव्हर मुस्लिम असला तर त्याची सर्व पाळेमुळे खणून काढली जात. हदीदला या सर्वांचा वीट येत होता. त्याच्याकडे ६०० फाइल्स होत्या. पैकी ७५ टक्के मुस्लिम तरुणांच्याविरुद्ध होत्या. पण न्यूयॉर्कच्या लोकसंख्येत अवघे ३ टक्के मुस्लिम होते! त्यातूनच हदीदला टॉप सिक्युरिटी क्लीअरन्स दिला नसल्याचे उघडकीस आले. कारण त्याने अल्जेरिया नागरिकत्व शाबूत ठेवले होते व त्या देशाच्या निवडणुकीत मतदानही केले होते.

मोशीन अल्ताफ हा मूळचा पाकिस्तानी. प्रत्येक मुस्लिमाकडे वक्रदृष्टीने पाहणे गैर आहे अशा त्याच्या विधानामुळे तो वरिष्ठांच्या मर्जीतून उतरला. मोहंमद अबदेल हा इजिप्शियन. त्याने तुरुंगात परकीय चलनात अफरातफर केल्याच्या आरोपावरून कैदेत असलेल्या एका मुस्लिमाशी जाऊन अर्धा तास भेट घेतली. त्याच्यावर संशयाची सुई रोखली गेली. १९९८ पासून हदीद कोणकोणत्या देशांना जाऊन आला त्याची छाननी झाली. एप्रिल ८, २०११ रोजी त्याचा युनिफॉर्म, बॅच आणि पिस्तूल काढून घेतले गेले. त्याच्यावर जाणूनबुजून खोटी विधाने केल्याचे आरोप होते. तसेच ईदच्या दिवशी त्याने रजा मागितली होती. ती नाकारली गेली. तरीही हदीदने जाणूनबुजून त्या दिवशी दांडी मारली होती. त्याचप्रमाणे त्याने फ्रान्समध्ये रखेल ठेवली असल्याचाही त्याच्यावर आरोप होता. खटला झाला. तो दोषी ठरला. त्याची नोकरी गेली. पुन्हा हातगाडीवर हॉटडॉग्ज विकावे असा विचार त्याने केला, पण त्याला पालिका लायसन्स देण्यास तयार नव्हती, कारण गुन्हा शाबीत झाला होता. त्याच कारणाने टॅक्सी ड्राइव्ह करण्यासही परवानगी मिळत नव्हती. त्याची पत्नी शीला जेन ही २०१० पासून बेकार होती. कारण ती ज्या शाळेत शिकवायची ती शाळाच बंद झाली होती, परंतु खर्च चालूच होते. घराचे हप्ते भरता येत नव्हते. त्यामुळे अल्जेरियातल्या त्याच्या गरीब कुटुंबीयांना मदत म्हणून हदीद दरवर्षी थोडेफार डॉलर्स पाठवत होता, तेही बंद करणे भाग होते. त्याच्या भोवतालच्या शेजाऱ्यांना तो मुस्लिम असल्याने कोणतीही सहानुभूती वाटणे शक्य नव्हते!

२०१४ साल संपत होते तेव्हा हदीदला थोडा दिलासा मिळाला. न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर अन्याय झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे आपली पोलीस नोकरी परत मिळावी म्हणून त्याने अर्ज केला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. माझ्याशी वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद केला गेला असे त्याचे म्हणणे होते. दाढी राखणे हे त्याच्या मुस्लिम धर्म शिकवणीचा भाग आहे, पण ती काढून टाकण्याचे माझ्या वरिष्ठांनी सुचवले होते, असेही त्याने तक्रारीत नमूद केले होते! त्याने ५ वर्षांत किमान ५०० ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले होते; पण कोणीही मुलाखतीलादेखील बोलावण्याची तसदी घेतली नाही. शेवटी त्याने पुन्हा टॅक्सी ड्रायव्हर होण्याचे ठरवले. रोज सकाळी उठून १२ तासांकरिता शेजारच्या गॅरेजमधून टॅक्सी भाड्याने घ्यायची. त्याकरिता दर दिवसाला १४० डॉलर्स भरावे लागतात आणि लंच बरोबर घेऊन ग्राहकांच्या शोधात फिरायचे. रोज फक्त पाण्याची एक लहान बाटली घेई; कारण सारखे लघुशंकेला जावे लागू नये.

बहुतेक वेळा त्याला गिऱ्हाईके भेटतात, ज्यांना विमानतळावर जायचे असते. पण तिथून शहरात परतताना अनेक वेळा रिकामी टॅक्सी घेऊन यावे लागते. त्याला उबेर कंपनीने जोरदार स्पर्धा दिल्याने काहीशा निराशेने ग्रासले आहे. ताप-सर्दी-खोकला-पडसे याने बेजार होऊन कामावर जाता आले नाही तर त्या दिवशीचे उत्पन्न शून्य असा सरळ अर्थ होतो. बऱ्याच वेळा पॅसेंजर्स विचारतात, किती वर्षे टॅक्सी चालवतो आहेस? २० वर्षे होऊन गेली. मध्यंतरी १५ वर्षे चालवत नव्हतो, आता पुन्हा चालू केले. कारण विचारले तर तो त्याची जीवनकहाणीही सुनावतो. कारण त्याची इच्छा असते, मुस्लिम असून पोलिसात नोकरी करणे किती कठीण आहे हे निदान त्या एका अमेरिकन नागरिकास तरी समजावे.