ठाणेकर अर्जुनचा देशात झेंडा, जेनेरिक मेडिसीनची चेन स्टोअर सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा

117

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाण्यासह देशभरात जेनेरिक मेडिसीनची चेन निर्माण करून सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्जुन देशपांडे याची ‘स्टुडंट इंटरप्रेन्युअर ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली आहे. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या भव्य सोहळ्यात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपूर्ण देशात झेंडा रोवणारा अर्जुन हा अवघ्या 17 वर्षांचा असून तो कळव्यात राहणारा आहे. कमी दरात रुग्णांना औषधे मिळावीत यासाठी  त्याने पाचजणांची स्वतःची टीम  तयार केली असून एवढ्या कमी वयात उत्तुंग भरारी घेणार्‍या अर्जुनची अमेरिकेतील एका संस्थेने फेलोशिपसाठीदेखील निवड केली आहे.

अर्जुन देशपांडे याची आई आरती देशपांडे या आंतरराष्ट्रीय फार्मा उद्योगात काम करतात. वयाच्या 14 व्या वर्षी आईबरोबर परदेशात तो गेला तेव्हा तेथील नागरिकांना अतिशय कमी दरामध्ये औषधे मिळत असल्याचे समजले. हिंदुस्थानात मात्र महाग औषधे का मिळतात या प्रश्नाने त्याला ग्रासले. एवढेच नव्हे तर त्याने स्वतः काही फार्मा कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून थेट औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांचीही त्याला साथ मिळाली. या क्षेत्रात अभ्यास केल्यानंतर अर्जुनने ‘जेनेरिक आधार’ नावाने ठाण्यातील मेडिकल स्टोअर्सबरोबर करार करून स्वस्त दरात औषधे विकण्यास सुरुवात केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आणि त्याला दिल्लीच्या जे. डब्ल्यू मेरियट या हॉटेलमध्ये ‘स्टुडंट इंटरप्रेन्युअर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला.

  • ठाण्यातील वाघबीळ, खोपट नाका व यशोधन नगर येथे अर्जुन देशपांडे याने जेनेरिक औषधांची चेन सुरू केली. तो देशातील सर्वात कमी वयाचा इंटरप्रेन्युअर ठरला आहे.
  • या पुरस्कारामुळे त्याचा हुरूप आणखी वाढला असून कल्याण, डोंबिवली, मुंब्रा तसेच पुणे व गोव्यातही तो जेनेरिक औषध विक्री केंद्रे सुरू करणार आहे. संपूर्ण देशातील रुग्णांना या औषधांचा लाभ मिळावा यासाठी अर्जुन पुढे काम करणार आहे.

दोनशे जणांमधून निवड

दिल्लीतील सोहळ्यात दोनशेहून अधिक स्टार्टअप्सनी पुरस्कारासाठी स्वतःच्या बिझनेस मॉडेलचे प्रेझेंटेशन केले होते. त्यातील अंतिम पाचजणांमध्ये लहान वयाच्या अर्जुनची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तो महाराष्ट्रातील सर्वात तरुण उद्योजक ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या