
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने क्रिकेटच्या कारकिर्दीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईऐवजी त्याने गोव्याकडून खेळता येतं का याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याला मुंबईऐवजी गोव्याकडून खेळण्याची इच्छा असल्याचे अर्जुन याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे. अर्जुन याने गुरुवारी असोशिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी विनंती केली असल्याचे कळते आहे.
गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विपुल फडके यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की, अर्जुन याने गोव्याच्या संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याला भाग घ्यायचा असून त्याने यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. आम्ही त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ना हरकत प्रमाणपत्र आणण्यास सांगितले आहे. अर्जुन याची तंदुरुस्तीची चाचणी घेतली जाईल आणि त्याची क्षमताही तपासली जाईल असे फडके पुढे म्हणाले. देशातील अनेक क्रिकेटपटूंप्रमाणेच अर्जुन यालाही गोव्याकडून खेळायचे असून त्याच्या निवडीसाठी आम्हाला ठरवून दिलेली प्रक्रिया पार पाडावीच लागेल असेही ते म्हणाले.
गेल्या मोसमात मुंबई संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. गेल्या मोसमासाठी अर्जुनची निवड करण्यात आली होती, मात्र त्याच्या वाटेला एकही सामना आला नाही. अर्जुन याने 19 वर्षाखालील क्रिकेटपटूंच्या संघातही स्थान मिळवले आहे. आयपीएलमध्ये अर्जुनची मुंबई इंडीयन्स संघाने निवड केली होती मात्र या संपूर्ण स्पर्धेत त्याला एकही सामन्यात मैदानात उतरवण्यात आलं नव्हतं.