आर्मेनिया-अजरबैजानमध्ये युद्धाला सुरुवात; 24 ठार, शेकडो जखमी

आर्मेनिया आणि अजरबैजान या दोन देशात वादग्रस्त भाग नागोर्नो कारबाखवरून युद्धाला तोंड फुटले आहे. तोफा, रणगाडे, मिसाईलद्वारे एकमेकांवर हल्ला सुरू असून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश सामान्य नागरिक आहेत. दरम्यान, दोन देश आमनेसामने आल्याने संयुक्त राष्ट्राने यावर दोन्ही देशांनी एकत्र येऊन चर्चा करून तोडगा काढावा आणि युद्धविरामाची घोषणा करावी असे आवाहन केले आहे.

दरम्यान, दोन देशांच्या या युद्धात तुर्कीने उडी घेतली असून अजरबैजानला पाठिंबा दिला आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब अर्दोआन यांनी ट्विट करून ही घोषणा केली. ‘मी आणि तुर्कीचे सर्व नागरिक अजरबैजान सोबत उभे आहोत. अजरबैजानवर हल्ला करून आर्मेनियाने सिद्ध करून दाखवले की हा देश जगातील शांततेसाठी घातक आहे. तसेच येथील नागरिकांनी भविष्याचा विचार करून सरकारला विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

रशियाने केलं शांततेचे आवाहन
पूर्व सोव्हिएत संघाचे देश असणाऱ्या आर्मेनिया आणि अजरबैजान यांना रशियाने शांततेचे आवाहन केले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मध्यस्थीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

तीन रणगाडे, दोन हेलिकॉप्टर उध्वस्त केले
दरम्यान, आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने अजरबैजानचे युद्धात मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. आर्मेनियाने एक व्हिडिओ प्रसिध्द करत अजरबैजानचे तीन रणगाडे उडवले आणि दोन हेलिकॉप्टर पाडले असा दावा त्यांनी केला. मात्र अजरबैजानने हा दावा फेटाळला.

आपली प्रतिक्रिया द्या