तरुणाला जीपला बांधणाऱ्या मेजरचा लष्कराकडून सन्मान

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कश्मीरमध्ये दगडफेकीपासून वाचण्यासाठी स्थानिक तरुणाला जीपला बांधून नेणारे हिंदुस्थानी जवान मेजर नितीन गोगोई यांना हिंदुस्थानी लष्कराने सन्मानित केले आहे. दगडफेक करणाऱ्या तरुणांवर जबर बसावी यासाठी तरुणाचा ढालीप्रमाणे वापर करणाऱ्या गोगोई यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी प्रशंसनीय सेवेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना तरुणांनी जवानांवर दगडफेक केली होती. या दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी जवानांनी लष्करी जीपच्या पुढील भागावर तरुणाला बांधून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला होता. यावरुन टीका सुरू असताना सैन्याने केलेल्या चौकशीनंतर या घटनेत सहभागी असलेले मेजर गोगोई यांना क्लिन चीट दिली होती.

अरुंधती रॉय यांना कश्मिरातील ‘त्या’ जीपला बांधायला हवे – परेश रावल

लष्कराने त्यावेळी उचललेल्या पावलामुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे लष्कराच्या सूत्रांनी म्हटले आहे. कश्मिरात झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान पोलिंग बूथ आणि अधिकाऱ्यांना जमावाने घेरल्यानंतर, सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तरुणाला जीपच्या पुढे बांधल्याचे बोलले जात आहे.