लष्करप्रमुख बिपीन रावत यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ प्रदान

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शांततेच्या काळात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांना आज परम विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे मेडल रावत यांना प्रदान केले. याचबरोबर राष्ट्रपतींनी सीआरपीएफचे दोन जवान राजेंद्र नैन, रवींद्र बबन धनवडे आणि लष्कराचे जवान (सिपॉय) ब्रह्मपाल सिंग यांना मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार बहाल करून गौरविले. बहाद्दर मेजर तुषार गौबा यांनाही मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार प्रदान केला.

जाट रेजिमेंटचे मेजर गौबा
मेजर तुषार गौबा हे 20 जाट रेजिमेंटचे आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक उडाली तेव्हा गौबा यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे इतर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला. यावेळी सीआरपीएफच्या 12 जवानांना शौर्यचक्र देऊन गौरविण्यात आले.

मराठी भाषिक तीन सैन्य अधिकाऱ्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल
लेफ्टनन जनरल शंशाक ताराकांत उपासनी यांना सैन्यातील साहसपूर्ण सेवेसाठी ‘अतिविशिष्ट सेवा मेडल’ने गौरविण्यात आले. यापूर्वी त्यांना ‘सेवा मेडल’, ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.

जम्मू आणि कश्मीर रायफल्सचे ब्रिगेडियर संजीव लांघे यांना सैन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी आज ‘अतिविशिष्ट सेवा मेडल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एयर कमांडर धनंजय वसंत खोत फ्लाइंग पायलट यांनी संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा मेडल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.