‘दिल्लीत लष्कर बोलवा, संचारबंदी लागू करा’; मुख्यमंत्री केजरीवाल यांची अमित शहांकडे मागणी

1313
arvind_kejriwal

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (NPR) विरोधात दिल्लीतील हिंसक आंदोलनात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार मंगळवारी, 25 फेब्रुवारी 2020 च्या रात्रीपासून या हिंसाचारातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान परिस्थिती गृहविभागाच्या हाताबाहेर गेली असून लष्कराला पाचारण करण्यात यावे अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले आहे.

दिल्लीची सध्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. पोलीस हरतऱ्हेने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र असे असले तरी देखील त्यांना त्यात संपूर्ण यश आल्यासारखे दिसत नाही. दिल्लीत लष्कराला पाचारण केले पाहिजे आणि हिंसाचार सुरू असलेल्या भागात संचारबंदी लागू केली पाहिजे. यासंदर्भात तातडीने पावले उचलण्यासाठी मी गृहमंत्र्यांना पत्र लिहित आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

दिल्लीतील अनेक भागात हिंसाचाराचे लोण आता पसरू लागले आहे. बाबरपूर भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी ध्वज संचलन करून शांतता प्रस्थापित केली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील अनेक भागातील इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, जीटीबी रुग्णायाचे अधिक्षक सुनील कुमार गौतम यांनी हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढला असल्याची माहिती दिली. पाच जणांतील चार जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सीबीएसईची परीक्षा पुढे ढकणार

दिल्लीतील अनेक भागात हिंसाचार सुरू असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई परिक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या