एल्फिन्स्टनच्या नव्या पूलाने पश्चिम रेल्वेचा सहावा मार्ग अडणार?

26
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

एल्फिन्स्टन रोड येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर लष्कराच्या वतीने एल्फिन्स्टन रोड परळ, करीरोड आणि आंबिवली या तीन स्थानकांत ३१ जानेवारी २०१८ पर्यंत पादचारी पूल उभारण्याची घोषणा संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत रेल्वेमंत्र्यांनी केली होती. यानंतर एल्फिन्स्टन रोडच्या पादचारी पुलाच्या कामालाही सुरुवात झाली. मात्र लष्कराकडून बांधण्यात येणाऱ्या या नवा पुलाचा एक खांब हा पश्चिम मार्गावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या सहाव्या मार्गासाठी अडथळा ठरत आहे. पश्चिम रेल्वेतर्फे या अतिरिक्त मार्गाचं काम सुरू आहे. मुंबई सेंट्रल आणि बोरीवली दरम्यान होणाऱ्या या सहाव्या मार्गावर एल्फिन्स्टनच्या नव्यापुलाचा एक खांब अडथळा ठरत आहे.

पश्चिम रेल्वेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने तयार होणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाचा हा खांब पश्चिम मार्गावरील सहाव्या मार्गावर अडथळा ठरत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ३१ जानेवारी पर्यंत हा पूल पूर्ण होईल असं सांगितल्यामुळे त्याकडे पूर्णपणे दूर्लेक्ष केलं जात आहे.

एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये २३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. लष्कराने याबाबत खबरदारी म्हणून प्रशासनाला कळवले आहे. मात्र अद्याप याचं काम जवळपास पूर्ण होत आलं तरी काहीही करण्यात आलं नसल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सध्या या चारही मार्ग रेल्वे वाहतूकीसाठी सुरू आहेत. त्यामधील दोन मार्ग हे धीम्या मार्गावरील वाहतूकीसाठी आहेत तर इतर दोन मार्ग हे जलद मार्गावरील वाहतूकीसाठी आहेत. तर बाहेरगावच्या रेल्वेसाठी पाचवा मार्ग वापरला जाणार आहे तसेच सहाव्या मार्गाचा वापर हा देखील बाहेर गावच्या ट्रेनसाठी होणार आहे. या सहाव्या मार्गावरून इतर ट्रेनची वाहतूक झाली तर त्याचा लोकल सेवेला अजिबात फटका बसणार आहे.

पाचवा मार्ग हा मुंबई सेंट्रल ते माहिम आणि त्यानंतर सांताक्रुझ ते बोरीवली दरम्यान असणार आहेत. तर सहाव्या मार्गाचं देखील काम सुरू आहे. मात्र यासाठी ९१८.५३ कोटींचा खर्च अपेक्षित असून ते दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा हा बोरीवली ते वांद्रे टर्मिनस २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर वांद्रे टर्मिनस ते मुंबई सेंट्रल असं २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, रविंदर भाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही झालं तरी पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गाचं काम थांबणार नाही. तसेच आम्ही यावर योग्य तो तोडगा काढू असंही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या