अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक कधी करणार? प्रताप सरनाईक यांचे गृहमंत्र्यांना पत्र

2897

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सत्य बाहेर येऊन त्याला न्याय मिळायलाच हवा, पण पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी 83 लाख बुडवल्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेले मराठमोळे वास्तुविशारद अन्वय नाईक यांना न्याय कधी देणार? असा सवाल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. पुण्यातील प्रख्यात बिल्डर सुरेश परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट पुरावा म्हणून ग्राह्य धरून आरोपींना अटक केली होती. मग अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्यांनाही अटक करा अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपशील आणि त्या तपासात झालेल्या दिरंगाईचा लेखाजोखा मांडला आहे.

मुंबईतील प्रख्यात मराठी वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी पाच मे 2018 रोजी त्यांच्या अलिबाग तालुक्यात असलेल्या काविर गावातील बंगल्यात आत्महत्या केली होती. याच वेळी त्यांच्या आईचा मृतदेह देखील तिथेच आढळला होता. यावेळी अन्वय नाईक यांनी लिहिलेले सुसाईड नोट हाती लागली असून, अलिबाग पोलिसात एफआयआर दाखल झाली आहे.

गोस्वामी यांच्या मुंबईतील स्टुडिओचे काम आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या कंपनीने घेतले होते. त्या कामापोटी उर्वरित 83 लाख रुपये गोस्वामी यांनी नाईक यांना काम पूर्ण झाल्यानंतर देखील न दिल्याने नाईक यांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले होते.

अर्णब गोस्वामी नाईक कुटुंबाचा गुन्हेगार
अक्षता नाईक यांचा विनंती करणारा एक व्हिडिओ आमदार प्रताप सरनाईक यांना मिळाला आहे त्यात माझ्या सासू आणि नवऱ्याच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार आहेत, तत्कालीन सरकारने आमचे केस दाबून टाकली. मला न्याय मिळाला नाही, अर्णब गोस्वामी माझ्या कुटुंबाचा गुन्हेगार आहे त्याला अटक करा असे श्रीमती नाईक यांनी म्हटले आहे.

अर्णब गोस्वामी यांचे सुसाईड नोटमध्ये पहिले नाव आहे तपासादरम्यान अर्णब गोस्वामी यांना केंद्र आणि राज्य सरकारमधील कोणत्या नेत्याने त्यावेळी वाचवण्याचा प्रयत्न केला याचीही चौकशी झाली पाहिजे- आमदार प्रताप सरनाईक

आपली प्रतिक्रिया द्या