येत्या 6 ते 22 सप्टेंबरदरम्यान इटली येथे होणाऱ्या जागतिक स्केट गेम्स स्पर्धेसाठी अर्णव मांद्रेची हिंदुस्थानी संघात निवड करण्यात आली आहे. 17 दिवस रंगणाऱया या स्पर्धेत 12 क्रीडा प्रकारांसाठी जगभरातील तब्बल 12 हजार खेळाडूंमध्ये थरार रंगणार आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी तब्बल 100 देशातील खेळाडू आपले स्केटिंग कौशल्य पणाला लावणार आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्केटबोर्डिंग क्रीडा प्रकारात सहभागी झालेले शेकडो खेळाडूही या स्पर्धेसाठी इटलीत दिसतील. अर्णव 18 वर्षांखालील ज्युनियर गटात फ्रीस्टाइल प्रकारात हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व करेल. त्याने नुकत्याच कोरियाच्या नामवन येथे झालेल्या जागतिक ज्युनियर स्केटिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तो पुण्याच्या हडपसर येथे राहत असून लोणी काळभोरच्या अँजेल कॉलेजमध्ये शिकतोय. आशुतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अर्णवने आतापर्यंत दमदार यश मिळवले असून जागतिक स्केट गेम्समध्येही त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.