हॉलीवूड अभिनेता अर्नॉल्ड श्वाझनेगरच्या गाडीचा भीषण अपघात

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता अर्नॉल्ड श्वाझनेगरच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी 4 गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या ज्यात अर्नॉल्डच्या गाडीचाही समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की अर्नॉल्डची गाडी त्याच्या पुढच्या गाडीवर जाऊन चढली होती. या अपघातात एक महिला जखमी झाली असून तिला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लॉस एंजलिस पोलिसांनी या अपघाताबाबतच्या वृत्ताला फॉक्स न्यूज डिजिटलशी बोलताना दुजोरा दिला आहे.

अपघात झाला तेव्हा अर्नॉल्ड GMC कंपनीच्या युकॉन कारने प्रवास करत होता. ही कार जगभरातील अत्यंत आलिशान आणि सुरक्षित गाड्यांपैकी एक आहे. अर्नॉल्डच्या गाडीने पुढे असलेल्या टोयोटा प्रियस गाडीला धडक दिली होती. या अपघातात अर्नॉल्ड काहीही इजा झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अपघातात जखमी झालेल्या महिलेच्या प्रकृतीबाबत अर्नॉल्डने चिंता व्यक्त केली असून ती लवकर बरी व्हावी अशी त्याने प्रार्थना केली आहे.