छत्तीसगडमध्ये मंत्र्याचे ‘सीडीकांड’; पत्रकार वर्मा यांना अटक

46

सामना ऑनलाईन । गाझियाबाद/रायपूर

अश्लील ‘सीडीकांडा’ने छत्तीसगडमध्ये खळबळ उडाली असून ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या गुह्याखाली ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी वर्मा यांच्या घरातून ५०० पॉर्न असलेली सीडी, पेनड्राइव्ह आणि २ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, वर्मा यांच्याकडे छत्तीसगडमधील भाजप सरकारचे मंत्री राजेश मुणत यांची अश्लील सीडी आहे. हे केवळ सीडीकांड नसून भाजप मंत्र्याचे सेक्स स्कँडल असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

विनोद वर्मा यांनी यापूर्वी बीबीसी हिंदी आणि ‘अमर उजाला’ दैनिकांत काम केले आहे. छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्याचे ते नातेवाईक आहेत. त्यामुळे विनोद वर्मा यांच्या अटकेमुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या पथकाने रात्री ३.३०च्या सुमारास गाझियाबाद येथे विनोद वर्मा यांना अटक करून घराची झडती घेतली. त्यात ५०० पॉर्न सीडी, २ लाख रुपये रोख आणि एक पेनड्राइव्ह जप्त केला आहे. वर्मा यांच्याकडे अशा एक हजार सीडी असल्याचा संशय असल्याचे रायपूरचे जिल्हा पोलीसप्रमुख राजीव शुक्ला यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश बजाज या व्यक्तीने फिर्याद दिल्यानंतर पत्रकार विनोद वर्मा यांना अटक केली आहे. अश्लील सीडीच्या आधारे आपल्याला धमक्या देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून सुरू होता. फोनवर धमक्या देणाऱया व्यक्तीने विनोद वर्मा हे नाव आपल्याला सांगितल्याची माहिती प्रकाश बजाज यांनी दिली. त्याआधारे वर्मा यांना अटक केली आहे. ‘आयटी’ कायद्यासह ब्लॅकमेल, धमकीचे गुन्हे वर्मा यांच्यावर दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र ‘सीडीकांड’ हे छत्तीसगडमधील भाजप सरकारमधील मंत्री राजेश मुणत यांचे सेक्स स्कँडल आहे. वर्मा यांना सूडबुद्धीने अटक केली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बधेल यांनी केला आहे.

मंत्री मुनोत म्हणाले, सीडी बनावट
छत्तीसगडचे मंत्री राजेश मुणत यांनी आपल्यावरील सेक्स स्कँडलचे आरोप फेटाळले आहेत. ती सीडी बनावट आहे. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत. पत्रकार वर्मा हे काँग्रेसचे एजंट आहेत, असे मुणत यांनी सांगितले.

माझ्याकडे मंत्री मुनोत यांची अश्लील सीडी – वर्मा
मंत्री राजेश मुणत यांची अश्लील सीडी माझ्याकडे आहे, अशी सीडी जनतेजवळही आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. त्या सीडीचा माझा संबंध नाही; फक्त जप्त केलेला पेनड्राइव्ह माझा आहे, असे पत्रकार वर्मा यांनी सांगितले..

आपली प्रतिक्रिया द्या