आळंदी मंदिरात माऊलींच्या अश्वांचे नाम जय घोषात आगमन

माऊलीचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून 10 जूनला निघाल्यानंतर 11 दिवसांचा प्रवास करीत अलंकापुरीत हरिनाम गजरात सोमवारी (दि.20) दाखल झाले. पालखी सोहळ्यातील परंपरांप्रमाणे अश्वांचे आळंदी देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले.

श्रींचे अश्वाचें अंकली (ता. चिकोडी, बेळगावी, कर्नाटक)) येथील राजवाड्यातून श्रींचे अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते. 11 दिवसांचे प्रवासानंतर अश्वाचें प्रथम येथील श्रीगोपाळकृष्ण मंदिर बिडकर वाड्यात आगमन झाले. येथे विसावा झाला. परंपरेने हरप्रीतसिंग बिडकर सरदार, उमेश बिडकर आणि बिडकर परिवार यांच्यातर्फे पूजा आणि स्वागत करण्यात आले. येथे आळंदी ग्रामस्थांचे वतीने माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी स्वागत केले.

बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्यादरम्यान माउलीच्या मंदिरात अश्व आळंदी समीप आल्याचा निरोप मिळताच श्री गुरुहैबतरावबाबा यांचे दिंडीने येत प्रथा परंपरेने अश्वांचे स्वागत पूजा केली. यावेळी अश्व सेवेचे मानकरी उर्जितसिंह शितोळे सरदार, महादजीराजे शितोळे सरकार, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, मालक बाळासाहेब आरफळकर, सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश आरु, स्वामी सुभाष महाराज, ज्ञानेश्वर गुळुंजकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर आदीसह भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.

सनईच्या वादनात, हरिनाम गजर आणि भाविकांची अश्व दर्शनास गर्दी केली होती. अश्व माऊली मंदिरात आले.पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे वतीने श्रींचे अश्वांचे स्वागत करण्यात आले. आळंदी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर कारंजा मंडपात सोहळ्यासह संस्थानचे वतीने अश्व पूजा झाली. मानकरी यांना नारळप्रसाद देण्यात आला. अश्व पूजेनंतर अश्व येथील फुलवाले समाज धर्मशाळेत मुक्कामी पोहोचले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात जाऊन अश्व प्रस्थान सोहळा अनुभवला.

उद्या माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान, असा होणार प्रस्थान सोहळा

पहाटे चार वाजता घंटानाद , सव्वा चार वाजता काकडा, त्यानंतर पवमान अभिषेख, पंचामृत पूजा व दुधारती, पाच वाजता भाविकांच्या श्रींचे चल पादुका महापूजा, सकाळी सहा ते दुपारी बारा या एलिट भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन, सकाळी नऊ वाजता विना मंडपात कीर्तन, दुपारी सडे बारापर्यंत श्रींचा गाभारा स्वच्छता, समाधीस पाणी घालणे आणि महानैवेद्य, दुपारी दोनपर्यंत भाविकांना समाधी दर्शन, अडीच चे सुमारास सोहळ्यातील दिंड्यांना मंदिर प्रवेश सुरू, श्रींचा पोशाख, दुपारी चार वाजता प्रस्थान सोहळ्यातील कार्यक्रम सुरु होतील. यामध्ये श्रीगुरु हैबतराव बाबा यांचे तर्फे श्रींची आरती, यानंतर देवस्थान तर्फे आरती, प्रमुख मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप, विना मंडपात पालखीत श्रींचे चल पादुकांची पूजा, प्राणप्रतिष्ठापना, देवस्थानतर्फे मानकरी यांना मनाचे पागोटे वाटप, श्री गुरु हैबतराव बाबा यांच्यातर्फे दिंडी प्रमुख मानकरी, पदाधिकारी यांना नारळ प्रसाद वाटप, श्रींचे समाधीजवळ संस्थानतर्फे नारळ प्रसाद वाटप, पालखीचे विना मंडपातून हरिनाम गजरात प्रस्थान, मंदिर प्रदक्षिणा व नगरप्रदक्षिणा करून श्रींचा वैभवी पालखी सोहळा लावा जम्यासह हरिनाम गजरात प्रदक्षिणामार्गे भराव रस्ता, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर चौकमार्गे चावडी चौकातून महाद्वारापासून जुन्या गांधी वाड्यातील नवीन दर्शन बारी मंडपात आजोळघरी पहिल्या मुक्कामास विसावणार आहे. तत्पूर्वी समाज आरती आणि रात्री हरी जागर आणि गांधी वाड्यात भाविकांना पालखीचे दर्शन होणार आहे. बुधवारी ( दि. 22 ) श्रींचा वैभवी पालखी सोहळा पुण्यनगरीकडे हरिनाम गजरात मार्गस्थ होणार आहे.