थिबा राजवाड्यात कलाजत्रेला प्रारंभ

41

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

आर्टसर्कल रत्नागिरीच्या वतीने आजपासून थिबा राजवाडा येथे कलाजत्रेला प्रारंभ झाला. या कलाजत्रेमध्ये चित्रकला, मातीकाम, विणकाम, छायाचित्र, ओरीगामी अशा विविध कलांचा सहभाग आहे. संगीत महोत्सवाला दि.27 जानेवारीपासून शुभारंभ होणार असून या महोत्सवात डॉ.काद्री गोपालनाथ, पंडीत रोणू मुजूमदार, ताकाहिरो आराही, पंडीत व्यंकटेश कुमार, बेगम परवीन सुलताना यांच्या संगीत मैफिली रंगणार आहेत.

आजपासून सुरु झालेल्या कलाजत्रेमध्ये पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेली निसर्गचित्रे, स्थिरचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. दि कॅड महाविद्यालय देवरुखच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मातीच्या वस्तू, विणकाम, रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात आले आहे. नरेंद्र घाणेकर आणि स्वानंद तांबे यांची ओरिगामी ही कलाही या प्रदर्शनात रसिकांना पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर चाकावर मडके बनवण्याचा आगळावेगळा अनुभवही या कलाजत्रेत लुटता येणार आहे. राजवाडय़ाच्या आवारातच माठ बनवण्याचे चाक आणि माती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ही कला जत्रा 29 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. आजपासून सुरु झालेली कलाजत्रा डि कॅड महाविद्यालयाचे कै.चारुदत्त अळवणी यांना समर्पित करण्यात आले असल्याचे आर्टसर्कलकडून सांगण्यात आले. आर्टसर्कलच्या वतीने दि.27 ते 29 जानेवारी दरम्यान कलासंगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.27 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डॉ.काद्री गोपालनाथ यांचे सॅक्सोफोन आणि पंडीत रोणू मुजुमदार यांच्या बासरीवादनाची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. त्यांना तबलासाथ ओजस आडीया आणि मृदुंगसाथ प्रविण व्ही.करणार आहेत. दि.28 जानेवारी रोजी विरजा आणि शामजीत किरण यांचे भरतनाटय़म पहायला मिळणार आहे. त्यानंतर बेगम परवीन सुलताना यांची संगीत मैफिल होणार असून त्यांना संवादिनी साथ अजय जोगळेकर देणार आहेत. महोत्सवाच्या तिसऱ या दिवशी 29 जानेवारीला जपानी कलाकार ताकाहिरो आराही यांचे संतुरवादन होणार आहे. त्यानंतर पंडीत व्यंकटेश कुमार यांचे शास्त्रा्य गायन होणार आहे. त्यांना तबलासाथ मंदार पुराणिक आणि संवादिनीसाथ अजय जोगळेकर करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या