देणगी

25

डॉ. विजया वाड

आई बाबांनी दिलेली जन्मजात देणगी जगणं समृद्ध करते.

नमिताला नाटय़गौरव पुरस्कार मिळाला आणि रेडिओ, टीव्ही चॅनेल्स, वृत्तपत्रे साऱया माध्यमांवर मुलाखतीचा नुसता धमाका उडाला. गौरव सोहळ्याला मुख्यमंत्री कार्यक्रमास आले होते. त्यांच्या हस्ते नमिताचा सत्कार होता. नमिताचे डोळे आनंदाने भिजले.

ती म्हणाली, ‘आई मंगला हिच्या कष्टांवर माझ्या यशाची कमान उभी आहे. ती अजूनदेखील पापड लाटते. लोणची करते. मसाला कुटते. का? तर नमिताला संगीत रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करता यावेत. एक गोष्ट सांगू? मी केवळ सहा वर्षांची असताना संभाजीराव यादव हे माझे पिताश्री मला नि माझ्या आईला सोडून परागंदा झाले. कारण त्यांनी रंगभूमीवरमद्यप्राशन केले आणि लोकांनी त्यांना मारहाण केली. त्या दिवशी ते रात्री घरातून नाहीसे झाले. ‘हरवलेला’ सापडतो, ‘दडलेला’ नाही सापडत नं? मग आईने मला संगीताचे प्रशिक्षण दिले. होय, गोड गाता गळा ही संभाजीराव यादवांची देणगी मजजवळ असल्याने आज मी हे मानाचे बक्षीस मिळवू शकले. ‘व्यसन माणसाला आयुष्यातून उठवतं’ हा धडा मी घेतला. मित्रांनो, वडिलांचे उपजत गुण घेऊन आईच्या कष्टांवर इथवर आले. आशीर्वाद द्या.’ती नतमस्तक झाली. सभागृहात शांतता. आई रंगमंचावर होती.

हा कोण? दाढी पांढरीशुभ्र! अंगात मळखाऊ अंगरखा! अरे, सरळ स्टेजवर चढला? ‘‘बेटा, मीच तो! दुर्दैवी संभाजी! माफी कर बापाला!’’ बापाने रंगमंचावर लेकीस आणि पत्नीस लोटांगण घातले. ‘उठा बाबा. हा कंठ तुम्ही दिलात नि मंचावर उभे राहण्याची ताकद आईने दिली. आजचा हा गौरव माझ्या मायपित्यास अर्पण!’ ऐसा गौरवाचा झाला गौरव… हसले रुसलेले दैव… नमितासाठी! आपणही तिला बेस्ट विशेस देऊया ना?

आपली प्रतिक्रिया द्या