स्नेहल बेंडके

94

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच स्नेहल विद्याधर बेंडके हिची ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स (राष्ट्रकुल स्पर्धा) पंच म्हणून निवड झाली होती. जागतिक बास्केटबॉल महासंघाकडून तिची ही निवड झाली होती. या स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड होणारी स्नेहल ही पहिली हिंदुस्थानी महिला पंच ठरली. तिच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे कॉमनकेल्थ गेम्स नुकतेच झाले. यासाठी जागतिक बास्केटबॉल महासंघाकडून जगातून एकूण २४ पंचांची निवड झाली होती. नऊ महिलांमधून माझा समावेश झाल्याचे स्नेहलने सांगितले. गेल्या चार वर्षांमध्ये विविध स्पर्धांमधील पंच म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेत महासंघाने माझी ‘कॉमनवेल्थ’साठी निवड केली. या निवडीची प्रक्रिया पाच महिन्यांची होती. या स्पर्धेत महिला गटांतील स्पर्धेसाठी पंच म्हणून स्नेहलने काम पाहिले. या निवडीमुळे आपल्या देशाला अधिकृतरीत्या पंच म्हणून प्रतिनिधित्व मिळाले असल्याची भावना स्नेहलची आहे. या निवडीबाबतचे यश हे जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि नियमित सरावामुळे तिला मिळाले. आजपर्यंतच्या तिच्या यशात आईवडिलांसह हिंदुस्थानी बास्केटबॉल महासंघ, राज्य बास्केटबॉल संघटनेचे पदाधिकऱ्यांचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले असल्याचे ती सांगते. जागतिक स्पर्धेत पंच म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून स्नेहल कार्यरत आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा श्रीगणेशा २००९ मध्ये चेन्नई येथील वरिष्ठ महिला अशिया वुमेन चॅम्पियनशिपने झाला. त्यात २०१२ मध्ये लंडन येथील ऑलिम्पिक गेम्समधील वुमेन सेमीफायनलमध्ये पंच म्हणून काम करणारी ती पहिली हिंदुस्थानी बास्केटबॉल पंच ठरली. आशिया सीनियर मेन्स कप आणि आशिया चॅम्पियन कप या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तिची निवड झाली होती. या स्पर्धेसाठी निवड झालेली ती पहिली आशियाई महिला पंच होती. ‘सीनियर वुमेन वर्ल्ड चॅम्पियनशिप’साठी दोनवेळा तिची निवड झाली. सर्व वयोगटांतील एशिया पातळीकरील बास्केटबॉल पुरुष व महिला स्पर्धेमध्ये ११ वेळा अंतिम सामना करणारी ती एकमेव हिंदुस्थानी बास्केटबॉल पंच आहे. महासंघाकडून झालेल्या निवडीमुळे ती खूप खूश होती. बास्केटबॉलमध्ये कोल्हापुरातील महिला खेळाडूंचे प्रमाण काढत आहे. त्याला बळ देण्यासाठी स्नेहलने काही योजना आखल्या आहेत. या अंतर्गत असलेल्या इनडोअर कोर्टसाठी शासनाने मदत करावी अशी तिची अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या