आर्थर रोड जेलमधून कोरोना लवकरच ‘हद्दपार’ होणार, 158 पैकी 120 कैद्यांचे रिपोर्ट

503

मुंबईत कोरोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना आर्थर रोड जेलमधील १५८ पैकी १२० कोरोनाबाधित कैद्यांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. तर शिल्लक ३८ जणांमध्येही आता कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने तेदेखील कोरोनामुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमच्या लढ्याला हे यश आले आहे.

आर्थर रोड कारागृहातील काही कैद्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळू लागल्याने ७ मे रोजी केलेल्या तपासणीत १५८ कैदी आणि २६ जेल स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह निघाले. कैद्यांसह कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर अचानक कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने जेलमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांनी तातडीने दखल घेत जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमसह कोरोनाबाधित कैद्यांवर आवश्यक औषधोपचार सुरू केले. खुद्द महानिरीक्षक पांडे यांनी कैद्यांशी वेळोवेळी संवाद साधून त्यांना धीर दिला. आत्मविश्वास दिला. त्यामुळे बारा दिवसांतच १२० कैदी कोरोनामुक्त झाले. शिवाय इतर कैद्यांमध्ये आता कोणती लक्षणेही दिसत नसल्याने तेदेखील कोरोनामुक्त होणार आहेत, असा विश्वासही पांडे यांनी व्यक्त केला.

अशा केल्या उपाययोजना
मोठ्या प्रमाणात कैदी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर तातडीने कारागृहातील सर्कल क्र. ३ व १० मध्ये क्वारेंटाईन कक्ष सुरू करण्यात आला. ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्विन’च्या डोससह लक्षणांनुसार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सहायक उपचार सुरू केल्याने नव्याने केलेल्या अहवालात आता १५८ पैकी १२० कैदी कोरोनामुक्त झाले आहेत. कारागृहात वैâद्यांना देण्यात आलेले औषधोपचार आणि पौष्टिक आहार देण्यात येत होता. शिवाय कैद्यांची आॉक्सिजन लेव्हल, पल्स लेव्हल वेळोवेळी तपासली जात होती. यामुळेच कैदी कोरोनामुक्त झाल्याचे महानिरीक्षक दीपक पांडे यांनी सांगितले.

तेराशे पैकी अकराशे कैद्यांचा जामिनासाठी अर्ज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोक्कासारखे गंभीर गुन्हे नसलेल्या कैद्यांना जामीन देण्याचा निर्णय हाय पॉवर कमिटीने घेतला आहे. यानुसार जेलमधील तेराशेपैकी अकराशे कैद्यांनी जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महानिरीक्षक दीपक पांडे यांनी दिली. यासाठी पोलीस अधिकारी भुतेकर विशेष प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत ३५ कैद्यांना जामीन मंजूर झाला असून जास्तीत सर्व अकराशे कैद्यांना जामीन मिळाल्यास कारागृहाला सोयिस्कर ठरणार असल्याचे ते म्हणाले.

ज्येष्ठ, महिला पोलिसांचे धाडस!
कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही मुंबई पोलीस अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. आर्थर रोड जेलमधील कर्मचारीही कोरोनाबाधित कैदी मोठ्या प्रमाणात असताना न डगमगता धैर्याने काम करीत आहेत. यामध्ये महिला पोलिसांना उपस्थिती बंधनकारक नसताना महिला पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. तसेच ५५ वर्षांवरील कर्मचार्‍यांना सूट असताना ५६ वर्षीय कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. कोरोनाला आम्ही हरवणारच असा ठाम विश्वास ते व्यक्त करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या