नरसिंह

796

>> अरविंद दोडे

नरसिंह… राजस श्रीविष्णूचे एकमेव उग्र रूप. येत्या शनिवारी नरसिंह जयंती आहे. त्यानिमित्ताने…

भगवंत गीतेच्या अध्यायात म्हणतात, ‘सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार घेतो.’ याचा प्रत्यय महापुराणांतील कथा वाचताना येतो. नृसिंहावतार, विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार. वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी हिरण्यकशिपूच्या नाशासाठी हा अवतरला. ‘अग्निपुराणा’त त्याची कथा आहे. भागवत पुराणात नरसिंहावतार कथेचे कारण दिले आहे, ते सर्वश्रुत असले, तरी भगवंताचा भक्त म्हणून भगवंताला आपले अव्यक्त, निर्गुण, निराकार स्वरूप सोडून मर्त्यलोकात मानवादी प्राण्यांप्रमाणे देहरूपाने अवतरावे लागते. मूळ कथा आहे, ती अशी –

हिरण्यकशिपू नामक दैत्यराजाने हजारो वर्षे तप करून ब्रह्माला प्रसन्न करून त्याच्याकडून अमरत्व मागून घेतल्याने तो उत्मत्त झाला होता. त्याचा भाऊ हिरण्याक्ष. हाही असाच वरदान मिळवून माजला होता. त्याचा वध विष्णूने केल्यापासून हिरण्यकशिपूने पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याचे चार पुत्र होते, त्यापैकी एक प्रल्हाद. प्रल्हादाची आई कयाधू. ती गरोदर असताना देवर्षी ‘नारद तिला राजवाड्यातून अरण्यात घेऊन गेले. तिच्यावर आध्यात्मिक, गर्भसंस्कार व्हावेत म्हणून दैत्यराजानेही संमती दिली. ऋषिमुनींच्या सहवासात कयाधू राहिली. बाळाचे नाव ठेवण्यात आले प्रल्हाद. नारदमुनींनी त्याला मंत्रदीक्षा दिलीः ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा दिव्य मंत्र दिला.

प्रल्हाद विष्णुभक्ती करू लागला. कालांतराने नारदमुनी राजमाता कयाधूला घेऊन दैत्यराजाकडे आले. इकडे देवदेवी, ऋषिमुनी ब्रह्माकडे गेले. हिरण्यकशिपूविरुद्ध तक्रार केली. ब्रह्माने सांगितले, ‘क्षमस्व! मी माझे वरदान परत घेऊ शकत नाही. तुम्ही महादेवाकडे जा.’ ते सगळे शंकराकडे गेले. शंकर म्हणाले, ‘आपण विष्णुदेवाला प्रार्थना करू.’ विष्णूने गाऱहाणे ऐकले. दैत्याचा वध करण्याचे वचन दिले.

प्रल्हादाला मारण्याचे अनेकदा राजाने आदेश दिले,अखेर त्याने संतापाने दरबारात प्रश्न केला, ‘या खांबात तुझा भगवंत आहे का?’ प्रल्हाद नम्रपणे उत्तरला, ‘होय. आहे.’ दैत्याने त्या खांबाला जोरदार लाभ मारली. त्याक्षणी खांबातून विष्णू नरसिंहरूपाने प्रकट झाला. ती वेळ होती सूर्यास्ताची. अर्धा पशू, अर्धा मनुष्य दाराच्या उंबरठय़ापर्यंत राजाला फरफटत नेले. आपल्या आक्राळविक्राळ देहाच्या मांडीवर दैत्याला आडवे केले आणि हाताच्या तीक्ष्ण नखांनी त्याचा वध केला. नंतर प्रल्हादाने भयभीत होऊन नरसिंहाला प्रार्थना केली, ‘हे भगवंता, मला तुझे शांत, सुंदर रूप बघायचे आहे.’ तेव्हा विष्णू मूळरूपात प्रगटला. दरबारातील दासी पद्मिनीसह सर्वांनी त्या राजस सुकुमार विष्णूला नमस्कार केला. स्तुती केली याच पद्मिनीने बाळ प्रल्हादाचा सांभाळ केला होता. पुढे नरसिंह दक्षिणेत गोदावरीच्या उत्तर तीरावर आला. तिथेच राहिला, अदृश्य झाला. साधुसंत हिरण्यकशिपूला ‘अज्ञाना’चा अवतार म्हणतात!

नरसिंहव्रत कसे करतात?
दिवसभर उपवास करावा. वैशाख शुक्ल चतुर्दशीला दुपारी तळ्यावर किंवा नदी, समुद्रावर जावे. आवळा, गोमय, मृत्तिका, तीळ आदी अंगाला लावावे. मग स्नान करावे. सायंकाळी शेणाने सारवलेल्या जमिनीवर आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर कलश ठेवावा. कलशात पाणी, सुपारी, नाणी, आंब्याची पाने ठेवून त्यावर तबक ठेवावे. तबकात लक्ष्मीनरसिंहमूर्ती स्थापून तिची पूजा करावी. प्रार्थना करताना हात जोडून म्हणावे, “हे देवाधिदेवा नरसिंहा! मी तुझ्या जयंतीला भोगरहित उपवास करीत आहे. तू सर्वश्रेष्ठ असून मजवर कृपा कर. मला धनधान्य, सुखसमृद्धी दे.’’रात्री जागरण करावे. भजन, कीर्तन, प्रवचन वा पोथीवाचन करावे. या क्रतामुळे पापनाश होतो.

आपली प्रतिक्रिया द्या