मुखपृष्ठांच्या दुनियेतील दलाल

482

आपल्या बहुकिध आयामी चित्रशैलीतून रसिकांवर अधिराज्य गाजवणारे चित्रकार दीनानाथ दलाल यांनी आपल्या अभिजात दृष्टीने मराठी प्रकाशन व्यवसायाचा चेहरा बदलून टाकला, त्याला सौंदर्याचं वरदान दिलं. ३० मे २०१७ हा दीनानाथ दलालांच्या १०१व्या जयंतीचा दिवस. यानिमित्त पुस्तकांच्या मुखपृष्ठ दुनियेतील दलालांचे योगदान सांगणारा, ज्येष्ठ कलासमीक्षक व निवृत्त प्राचार्य प्रा.मं. गो. राजाध्यक्ष यांचा हा लेख.

विसाव्या शतकातील महाराष्ट्रात निरनिराळ्य़ा क्षेत्रांमध्ये कर्तबगारी गाजवणारी अनेक व्यक्तिमत्त्वे जन्माला आली. ज्यांनी आपल्या कार्याने मराठी माणसाच्या मनावर आपले नाव कोरले. अशाच अलौकिक व्यक्तिमत्त्वापैकी ३० मे १९५६ रोजी गोव्यातील मडगाव येथे जन्मलेले व पुढे मुंबईला आपली कर्मभूमी केलेले एक नाव म्हणजे दीनानाथ दामोदर दलाल!
गोमांतकातील निसर्गरम्य परिसरात वाढलेल्या दलालांनी शालेय शिक्षण पूर्ण होताच मुंबई गाठली. केतकरांच्या क्लासमधून परीक्षा दिल्या व जी. डी. आर्ट ही पदविका मिळवली. काही काळ ‘बी. पी. सामंत’ या जाहिरात संस्थेत काम केले व आपल्या चित्रांकनावर एक स्वतंत्र अशी स्वतःची छाप पाडून दलाल या तरुण चित्रकाराची प्रकाशन क्षेत्रात लक्षवेधक वाटचाल सुरू झाली आणि लवकरच केनेडी ब्रिजवर त्यांचा ‘दलाल आर्ट स्टुडिओ’ दिमाखात सुरू झाला.

चित्रकलेत पारंगत असलेल्या दलालांनी रेखाटनाची व रंगलेपनाची स्वतःची अशी खास शैली निर्माण केली. अभिजात कलेमध्ये शिक्षण घेऊनही त्यांनी उपयोजित कलेचा मार्ग चोखाळला व आपल्या चित्रांना अभिजात कलेचा वास्तववादी वारसाही दिला. दलालांनी प्रामुख्याने काम केले ते प्रकाशन क्षेत्रात. अनेक साहित्यिक त्यांच्या मित्रवर्तुळात असत. यामध्ये द. ग. गोडसे, पुरुषोत्तम चित्रे, गोपाळकृष्ण भोळे यांचा समावेश होता. यामुळे दलालांना साहित्याचे गुण होते, संगीताचा कान होता आणि या साहित्यकाव्य, संगीताच्या ओढीने त्यांनी कला-साहित्याला वाहिलेले ‘दीपावली’ हे वार्षिक सुरू केले. तो काळच म्हणजे मराठी भाषेच्या वैभवाचा काळ होता. उत्तमोत्तम लेखकांची पुस्तके, मासिके, दिवाळी अंक यांची रेलचेल होती आणि हे सर्व नटून सजून वाचनवेड्य़ा वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम हे दलाल करीत असत.
साधारणपणे १९४० ते १९७० दरम्यान सर्व मराठी वाचकांवर दलालांची मोहिनी होती. त्या काळातील ‘सत्यकथा’, ‘धनुर्धारी’, ‘मौज’ यांची मुखपृष्ठ विलोभनीय असत. एकट्य़ा ‘सत्यकथा’ या आधुनिक विचारप्रणालीच्या मासिकांची दलालांनी असंख्य मुखपृष्ठ केली आहेत. त्याचसोबत अनेक नावाजलेल्या लेखकांची पुस्तके देखील त्यांनी आविष्कृत केली आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे, ग. ल. ठोकळ, ना. धों.ताम्हणकर तसेच नंतरच्या पिढीतील जयवंत दळवी, रणजीत देसाई, वि. वि. बोकील अशा तोलामोलाच्या लेखकांची पुस्तके आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे केवळ वेष्टण नव्हे, तर पुस्तकातील मजकुराचा मथितार्थ, त्यातील व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष आदी बाबी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे एकतर ते वाचावे लागते किंवा वेळेअभावी लेखकांकडून त्यातील कल्पना समजून घेऊन त्यावर खास दलालटच देऊन त्यांचे मुखपृष्ठ तयार होत असे. कित्येक प्रकाशक त्यावेळी मुखपृष्ठ दलालांचेच हवे यासाठी आग्रही असत किंबहुना पुस्तकाची विक्री हीदेखील कित्येकदा दलालांच्या कुंचल्याची किमया असे. मग तो ना. धों.ताम्हणकरांचा ‘गोट्य़ा’ व ‘चिंगी’ असो किंवा वि. वि. बोकीलांचा ‘वसंत’ असो!

मुखपृष्ठासोबतच त्यावरील मासिक वा पुस्तकांची शीर्षकेदेखील दलाल तितक्याच कलात्मक दर्जाची करीत. त्यांच्या अक्षरांमध्येही कल्पकता असे. एक प्रकारचा गोडवा असे. मुखपृष्ठ करताना दलाल नेहमीच त्या विषयाचा मूड पकडीत असत. मग ते ‘स्वामी’ असेल तर सुलभतेकडे वळून त्यावर पेशवाईचा साज असे, बनगरवाडीवर दिसणारा राकटपणा असे, पुलंच्या ‘खोगीर भरती’वर विनोदाची झालर असे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’वर राणी लक्ष्मीबाईंची आक्रमक प्रतिमा असे. विषयानुरूप ते त्याचा आविष्कार घडवीत. ‘मुखपृष्ठ आणि दलाल’ असे समीकरणच त्या काळात तयार झाले होते. त्यांच्या ‘दीपावली’मध्ये खास अशी तिरंगी चित्रमालिका असे, ज्यामधून त्यांनी अनेक शृंगार नायिका सादर केल्या.

दलालांच्या स्त्रीचित्रणात विविध अशा स्त्री छटा त्यांनी रेखाटल्या. स्त्रीची मोहकता, कमनीय बांधा, आरक्त गाल, थोडीशी अनावृत आकृतीबंध प्रणायतुर आणि महत्त्वाचे म्हणजे विषयानुरूप आकृतीबंध व हुकमी रंगसंगती. यामुळे त्यांच्या चित्रांत एक प्रकारची मोहकता येत असे. एखादा ग्रामीण विषय ज्या लालित्याने ते खुलवायचे, तेवढेच ऐतिहासिक व पौराणिक प्रसंगही फुलवायचे आणि या कारणांनी पुस्तकांची मुखपृष्ठ व आतील रेखाटने त्यांचे खास वैशिष्ट्य़ ठरले.
दलाल हे स्वयंस्फूर्त चित्रकार होते. त्यांना कलेतील सौंदर्यस्थळे शोधणे ही निसर्गदत्त लाभलेली देणगी होती. त्यामुळे त्यांच्या चित्रात छायाचित्रात्मक शैली अथवा शैक्षणिक पद्धत कधीच जाणवली नाही. अनावश्यक तपशील टाळून त्यांनी केलेली कला निर्मिती ही केवळ त्यांचीच होती. ते नेहमीच प्रयोगशील राहिले. त्यामध्ये अभिजात पद्धतीची वास्तववादी शैली होती, पारंपरिक शैली होती तशीच सुलभतेच्या वाटेने जाणारी नवचित्र शैलीही होती.

आज काही अभिजात कलाकार दलालांच्या कलेचे मूल्यमापन करताना म्हणतात की, दलालांना अभिजात कलासाधना व निर्मिती करता आली नाही याचे शल्य होते, पण माझ्या मते हे शक्य नाही. त्यांच्या चित्रांनी मराठी मनात प्रेमाचे व श्रद्धेचे स्थान मिळवले. त्यांना नेहमीच साहित्यिक, कवी, संगीतकारांच्या गराड्य़ात रहाणे आवडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना लाभलेला सर्वच स्तरातील चाहतावर्ग. यामुळेच त्यांच्या व्यावसायिक कामांना त्यांनी नेहमीच अभिजात कलेचा स्पर्श दिला. त्यांचा ‘दलाल आर्ट स्टुडिओ’ वैभवाच्या शिखरावर होता. पण सृष्टीच्या विधात्याला आपल्या रंग-कुंचल्यांच्या सहाय्याने प्रतिविश्व निर्माण करणाऱ्या कलावंतांबद्दल असूया निर्माण झाली असावी… चित्र निर्मितीच्या मैफलीत मग्न असताना वयाच्या केवळ ५५व्या वर्षी १५ जानेवारी १९७१रोजी काळाने आपणातून हिरावून नेले. ३० मे २०१७ हा दीनानाथ दलालांच्या १०१व्या जयंतीचा दिवस. प्रत्येक मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या या मनस्वी कलाकाराला विनम्र अभिवादन!

आपली प्रतिक्रिया द्या