व्यापार बंदची पाकिस्तानची धमकी पोकळ, कलम 370नंतर हिंदुस्थानकडून केली औषधांची आयात

कलम 370नंतर हिंदुस्थानसोबत व्यापार बंद करण्याची शेखी मिरवणाऱ्या पाकिस्तानने पुढच्या महिन्याभरातच नाक मुठीत धरून हिंदुस्थानशी व्यापार केल्याचं वृत्त आहे. कारण, कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने मानभावीपणा करत हिंदुस्थानशी व्यापारी संबंध तोडले होते. मात्र, त्याच्या महिन्याभरातच हिंदुस्थानकडून औषध आयात केल्याचं उघड झालं आहे. या आयातीवरून पाकिस्तानमध्ये जोरदार गदारोळ माजला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ऑगस्ट 2019मध्ये जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला. पण, या निर्णयामुळे पाकिस्तानची लाहीलाही झाली आणि पाकिस्तानने हिंदुस्थानसोबत व्यापार पूर्णतः बंद करत असल्याची घोषणा केली. पण, हा निर्णय घेतल्यानंतर महिन्याभरात पाकिस्तानने 450 हून अधिक प्रकारची औषधं हिंदुस्थानकडून मागवली. यात कर्करोगांसारख्या अनेक दुर्धर आजार आणि विकारांवरची औषधं होती. विशेष म्हणजे, औषधांसोबत विटॅमिन्स, इंजेक्शन्स आणि तिळाचं तेलंही आयात केलं गेलं. मात्र, ही बाब त्यावेळी उघड झाली नव्हती. आता पाकिस्तानमध्ये ही औषधं आयात केल्याचं उघड झाल्याने इम्रान सरकारच्या निर्णयावर राजकीय गदारोळ माजला आहे.

इम्रान सरकारवर पाकिस्तान यंग फार्मासिस्ट असोसिएशनने हिंदुस्थानशी व्यापार बंद केलेला असूनही औषध का आयात केली, याची विचारणा करणारं पत्र इम्रान यांना धाडलं आहे. तसंच, पाकिस्तान कॅबिनेटच्या मंजुरीशिवायच 85 मिलियन डॉलर इतक्या किमतीच्या टायफॉईड लसींची आयात केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तसंच, यापूर्वी कॅबिनेटने डेंग्युच्या औषधांच्या आयातीवरही नकार दिला होता. मात्र, ती देखील आयात केली गेली आहेत. त्यामुळे हा औषध घोटाळा असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारवर होत आहे. पाकिस्तानच्या मुस्लीम लीग-एन या राजकीय पक्षाचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी या घोटाळ्याचा आरोप केला असून संसदीय समितीकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या