संयुक्त राष्ट्रात हिंदुस्थानचा विजय,पाकिस्तानला झटका

893

370 कलम रद्द करण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयावर संयुक्त राष्ट्र संघात चर्चा घडवून आणण्याचा पाकिस्तानचा नापाक इरादा शुक्रवारी उधळला गेला. 370 कलम हा हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा असून या प्रश्नात बाहेरच्यांनी नाक खुपसण्याची कोणतीही गरज नाही असे हिंदुस्थानने स्पष्ट बजावले. रशिया हिंदुस्थानच्या पाठीशी उभा राहिला, तर चीनने पाकिस्तानची पाठराखण केली. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन तटस्थ राहिले.

कलम 370 रद्द केल्यानंतर कश्मीर मुद्यावर चर्चा करण्याची चीनने मागणी केल्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आज तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीस यूएनएससीचे 5 कायमस्वरूपी, तर 10 हंगामी सदस्य हजर होते. विद्यमान अध्यक्ष पोलँड यांनी कश्मीरचा मुद्दा पटलावर मांडला. त्यावेळी चीनने कश्मीरप्रश्नी चिंता व्यक्त केली. तसेच तेथील परिस्थिती तणावग्रस्त आणि धोकादायक असल्याचा मुद्दा उपस्थित केला, परंतु रशियाने हिंदुस्थानची बाजू घेतली.

कश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय मुद्दा असून 370 कलम रद्द करणे हा हिंदुस्थानच्या अंतर्गत प्रश्न आहे. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय जम्मू-कश्मीरच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या निर्णयात बाहेरच्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे रशिया आणि हिंदुस्थानने ठणकावून सांगितले. पाकिस्तानचे नाव न घेता या राष्ट्रांनी एक देश जम्मू-कश्मीरप्रश्नी जिहाद आणि हिंसेची भाषा करतो असा टोला हाणला. तसेच जम्मू-कश्मीरमधील स्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशीही ग्वाही दिली.

पाकिस्तानला यूएनएससीच्या बैठकीत सहभागी करण्याची मागणी फेटाळली

बैठकीपूर्वीच पाकिस्तानला दोन मोठे झटके बसले. यूएनएससीने पाकिस्तानला बैठकीत सहभागी होण्याची परवानगी न देता त्यांची मागणी फेटाळून लावली. पाकिस्तान संयुक्त राष्ट्राचा कायमस्वरूपी अथवा हंगामी असा कोणताही सदस्य नाही. चीनव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाने पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानला बैठकीत सहभागी करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असा दुसरा झटका देत संयुक्त राष्ट्र संघाने पाकचे थोबाड फोडले.

कश्मीरात शांतता कायम राखण्यासाठी कटिबद्ध – अकबरुद्दीन

कलम-370 रद्द करण्याचा हिंदुस्थान सरकारचा निर्णय जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये सुशासन आणि सामाजिक-आर्थिक विकास करण्यासाठीच आहे. कश्मीरात शांतता कायम राखणे तसेच तेथील नागरिकांवर लादलेले प्रतिबंध हळूहळू संपुष्टात आणण्यासाठी हिंदुस्थान कटिबद्ध आहे, असे संयुक्त राष्ट्र संघातील हिंदुस्थानचे प्रतिनिधी  अकबरुद्दीन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या