370 कलम: विशेष दर्जा नाही, तर विशेष भेदभाव करणारे

539
ajit-doval

जम्मू-कश्मीरमधून रद्द करण्यात आलेले 370 कलम हे कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम नव्हते तर ते कश्मिरींबरोबर विशेष भेदभाव करणारे कलम होते. त्यामुळेच हे कलम रद्द केल्यानंतर सर्वसामान्य कश्मिरींनी त्याचे स्वागत केले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशी आणि परदेशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

370 कलम रद्द केल्यानंतर कश्मीरमधील काही भागांत निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘लँडलाइनवरील निर्बंध 100 टक्के मागे घेतले असून ही सेवा सुरू झाली आहे. मात्र, इंटरनेट आणि जाहीर सभांवर बंदी घातली आहे. त्याचा दहशतवादी आणि समाज विघातक शक्तींकडून दुरुपयोग होऊ शकतो. म्हणून त्यावरील निर्बंध काही प्रमाणात ठेवण्यात आले आहेत.’

…नाही तर बांगडय़ा घाला!

पाकिस्तानला कश्मीरमध्ये शांती नको आहे. त्यामुळेच पाकिस्तानने इथल्या  समाजविघातक शक्तींना चिथवायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान अशा चिथावणीखोरांना आदेश देत असल्याचे उघडकीला आले आहे. तुम्ही लोक काय करत आहात, सफरचंदाचा व्यापार सुरू कसा झाला? रस्त्यांवर इतके ट्रक कसे दिसत आहेत? तुम्ही लोक हे रोखू शकत नसाल तर हातात बांगड्या भरा, असे चिथावले जात असल्याचे डोवाल यांनी माध्यमांना सांगितले.

230 दहशतवादी सक्रिय

कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने 230 दहशतवाद्यांना सक्रिय केले आहे. त्यातील काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून काहींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कोणत्याही परिस्थितीत कश्मीरमधील वातावरण बिघडू नये याची काळजी आम्ही घेत आहोत.

दुकानदाराची हत्या

कश्मीरमधील मोठ्या फळ विक्रेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी दहशतवाद्यांनी केला. मात्र, नमाजसाठी गेले असल्यामुळे ते वाचले. एकाने त्याचे दुकान उघडले म्हणून दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. अशा प्रकारे पाकिस्तान हत्या आणि दहशत पसरवून कश्मीरमधील परिस्थिती ठीक नसल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर भासवू पाहत आहे, असे डोवाल म्हणाले.

केवळ दहा भागांमध्ये निर्बंध

कश्मीरमध्ये केवळ 10 ठिकाणीच निर्बंध आहेत. सैन्य आणि पोलीस दल कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता आपले काम करत आहे. कश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या