आभाळमाया -‘विक्रम’ची उडी!

>> वैश्विक,  [email protected]

एकेकाळी ‘चांदोबा’मध्ये ‘विक्रम आणि वेताळ’ नावाची कथा प्रसिद्ध व्हायची ती आम्ही चवीने वाचायचो. आता आधुनिक बालकथाही वैज्ञानिक करता येतील. आपण तर ‘विक्रम आणि प्रज्ञान’ यांची खऱ्या चांदोबावरची खरी गोष्ट सांगू शकतो. फिल्ममध्ये दाखवू शकतो. हिंदुस्थानच्या ‘चांद्रयान-3’ने जगाचे लक्ष वेधून घेतले. 14 जुलै ते 23 ऑगस्ट असा प्रदीर्घ अंतराळप्रवास करून आपले ‘चांद्रयान-3’ चांद्रपृष्ठावर उतरले तेव्हा ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी आणि सर्वसामान्यांनीही मोठा जल्लोष केला. गेल्या वेळच्या अखेरच्या क्षणी आलेल्या अपयशानंतर यावेळचं यश अधिक आनंददायी होतं. ‘चांद्रयान-2’च्या वेळीच चार वर्षांपूर्वी पाठवलेलं चांद्रकक्षायान किंवा ल्युनार-ऑर्बिटर आजही त्याची कामगिरी चोखपणे बजावतंय. नुकताच त्याने आपल्या अपयशी ‘चांद्रयान-2’चासुद्धा फोटो मिळवला. तशी गफलत होऊ नये म्हणून यावेळी ‘विक्रम’मध्ये ‘ऑटिटय़ूट करेक्शन’ची सोय करून सुमारे अडीच चौ. मीटरमध्ये योग्य ती सपाटभूमी ‘स्वतःच निवडण्याची यंत्रणा बसवल्यामुळे सेफ लॅण्डिंग होणारच होतं, परंतु अशा सेकंदासेकंदाच्या गणितात क्षणिक गडबड झाली तरी सगळय़ा प्रयत्नांवर पाणी पडतं. मात्र यावेळी सर्व काही यथायोग्य जमलं आणि ‘विक्रम’ त्यातील ‘प्रज्ञान’ वाहनासह कोणताही देश आजवर न पोहोचलेल्या दक्षिण चांद्रध्रुवावर सुखरूप उतरलं.

आपला हा चंद्रावरचा दक्षिण दिग्विजय देदीप्यमान असला तरी तिथे नुसतंच ‘उतरायचं’ नव्हतं तर काही वैज्ञानिक प्रयोग, संशोधनही करायचं होतं. प्रवासाचा ‘शीण’ आला म्हणून विक्रम आणि प्रज्ञानला स्वस्थ बसता येणार नव्हतं. कारण पुढच्या 14 दिवसांचा क्षणक्षण चांद्रपृष्ठावर कणन्कण तपासण्यासाठी (ठरावीक भागात) खर्च करायचा होता. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी ‘विक्रम’ चंद्रावर उतरल्याची आनंदवार्ता आली आणि लगेच पुढच्या पंधरवडय़ासाठी चांद्रपृष्ठ संशोधनाला सुरुवातही झाली. ‘चंद्राच्या मंदगती’मध्ये आपण चांद्रदिवस आणि रात्र प्रत्येकी पृथ्वीच्या 14 संपूर्ण दिवसांइतके (24 तासांचे) असतात हे वाचलंय. तो एका चांद्रदिवसाचा संपूर्ण सूर्यप्रकाशाचा आणि त्याद्वारे आपल्या ‘विक्रम’मधून नेलेल्या ‘प्रज्ञान’ रोव्हरला ऊर्जा देणारा सौर ऊर्जा पुरवणारा काळ ठरल्याक्षणीच संपणार होता. त्याप्रमाणे रोव्हरने ठरावीक अंतर पार करून चांद्रपृष्ठाचं निरीक्षण आणि मातीचं परीक्षण करून त्याचा अहवाल पृथ्वीवर ‘इस्रो’कडे पाठवला. या सहाचाकी चांद्रवाहनाने चंद्रावरच्या मातीचे रासायनिक पृथक्करण आणि खडकांच्या गुणधर्माची माहिती नियोजित कार्यक्रमानुसार करत राहिले. त्याने अंतराळयानाजवळच्या (विक्रम) चांद्रपृष्ठावरील ‘प्लाझ्मा’ची (आयन आणि इलेक्ट्रॉन) घनता आणि त्यात होणारे बदल नोंदवले, जिथे ते उतरले त्याजवळच्या चांद्रभूकंपनांचीही नोंद झाली. याशिवाय चंद्राच्या खडक-मातीतील खनिजे यांची माहिती जमा केल्याने आता चांद्रीय खनिजरचनेतून चंद्रावरच्या खडकांचे मूळ स्वरूप समजू शकेल आणि विशेष म्हणजे ‘चांद्रयान-3’ मोहिमेने प्रथमच चांद्रपृष्ठावरील सल्फरचा शोध घेतला आहे. तो जगासाठीही नवा आहे असं खगोल अंतराळ अभ्यासक प्रदीप नायक यांनी सांगितलं.

‘विक्रम’विषयी सांगायचं तर ‘इस्रो’चे प्रमुख सोमनात यांनी पूर्वीच सांगितल्यानुसार ‘चांद्रयान-3’ ने सेफ लॅण्डिंग आणि निरीक्षण-परीक्षणाचे काम व्यवस्थित केले आहे. 14 ऑगस्टला चांद्रकक्षेत पोहोचलेले ‘विक्रम’ 23 ऑगस्टला तेथे उतरले आणि 24 ऑगस्टपासून पुढचा पंधरवडा (चौदा दिवस) अव्याहतपणे चांद्रभूमीवर फेरफटका घेऊन संशोधनकार्य पूर्ण झाले.

आता तिथला काळोख आठ-नऊ सप्टेंबरपर्यंत संपेल. पुन्हा आपल्या चौदा दिवसांसाठी चांद्रदिन सुरू होईल. या काळात प्रज्ञानला पुन्हा जागं करण्याचा प्रयत्न होणार आहे. वजा 204 तापमानात गारठलेले ‘प्रज्ञान’ सौर ऊर्जा पुन्हा मिळून दीर्घनिद्रेतून जागे व्हायला थोडा वेळ लागेल. कदाचित हा लेख हाती येईपर्यंत त्याचे काम नव्याने सुरू झालेही असेल, पण तसे नसले तरी त्याने त्याला दिलेली जबाबदारी आधीच पार पाडली आहे. त्याला ‘बोनस’ आयुष्य लाभले तर ते अधिकच आनंददायी ठरेल.

विक्रमसारखे लँडर (अवतरक) काही इंच उडवून पुन्हा जवळच सुखरूप स्थिर करण्यातही ‘इस्रो’च्या संशोधकांना यश आलं. ‘विक्रम’ची ही उडी भावी चांद्र मोहिमांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. उद्या चंद्रावर माणूस पाठवून परत आणण्याची मोहीम होईल तेव्हा चांद्रपृष्ठावर उतरलेल्या यानाला कमांड समजून तेथून पुन्हा उड्डाण करून ऑर्बिटर गाठावे लागेल. त्यासाठी चांद्रपृष्ठावरून स्वतःला उचलता येणारे अवतरक हवे. ते सारे पृथ्वीवरूनच कंट्रोल करावे लागते. त्याची टेस्ट ‘विक्रम’च्या उडीने झाली. म्हणजे भविष्यकाळातील विक्रम चांद्रपृष्ठावरून पुन्हा उड्डाण करण्याचा आणि चांद्रवीरांना परत पृथ्वीवर आणण्याचाही विक्रम करू शकेल असा आत्मविश्वास त्यातून लाभला. तो फार महत्त्वाचा आहे.