तिखट भाकरी

<<भीमाबाई विश्वासराव (शिवडी)>>

पाव किलो बाजरी, पाव किलो ज्वारी, शंभर ग्रॅम गहू, सव्वाशे ग्रॅम चणा डाळ, सव्वाशे ग्रॅम मटकी,३ मोठे कांदे,१ लसूण कांदा, ८ ते १० हिरव्या मिरच्या, छोटा अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, १ छोटा चमचा जिरं, तेल, एक स्वच्छ सफेद पातळ कापड.

कृती : बाजरी, ज्वारी, गहू, चणा डाळ, मटकी ही धान्ये गॅसवर मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजून घ्यावीत. नंतर भाजलेल्या धान्याचे मिश्रण चक्कीवर बारीक दळून घ्यावे. त्यानंतर धान्याचे दळलेले मिश्रण चाळणीने चाळून घ्यावे. या मिश्रणात बारीक चिरलेले ३ कांदे, बारीक चिरलेली कोथिंबीर,१ छोटा चमचा जिरं, छोटा अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, १ लसूण कांदा आणि ८ ते १० मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून टाकाव्यात. नंतर या मिश्रणात पाणी ओतून मिश्रण एकजीव करून घट्ट होईपर्यंत मळावे. पीठ मऊ होण्यासाठी त्यात एक छोटी पळी तेल ओतून १५ मिनिटे ठेवावे. नंतर गॅसवर तवा गरम होण्यास ठेवावा. मग एका पोळीपाटावर सफेद रंगाचे ओले कापड अंथरावे. त्यावर पीठाचा गोळा ठेवून हाताने गोलाकार थापून घ्यावा. त्यानंतर तव्यावर कालथ्याच्या सहाय्याने तेल पसरवून पोळपाटावरील भाकरी अलगद उचलून तव्यावर शिजण्यास ठेवावी. मग भाकरीच्या बाजूने थोडे तेल सोडावे म्हणजे भाकरी पलटायला सोपे जाते. १ मिनिट शिजून झाल्यानंतर कालथ्याच्या सहाय्याने भाकरी पलटून घ्यावी व पुन्हा थोडे तेल भाकरीच्या बाजूने सोडून त्यावर झाकण ठेवून, मंद आचेवर १ मिनिट भाकरी शिजू द्यावी. १ मिनिटानंतर भाकरी ताटात काढून घ्यावी. भाकरीवर साजूक तूप पसरवून टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत गरमागरम आस्वाद घ्यावा. साजूक तुपामुळे भाकरीची लज्जत अधीकच वाढते. या भाकरीला ‘थालीपीठ’ म्हणतात, पण जुन्नर भागात त्यास ‘तिखट भाकरी’ असे संबोधले जाते. सकाळच्या न्याहरीसाठी ’तिखट भाकरी’ हा एक स्वादिष्ट व आरोग्यासाठी पौष्टिक असा पदार्थ आहे. त्याचबरोबर आजच्या धावपळीच्या व फास्ट फूडच्या युगात आरोग्यदायी विचार करणाऱ्यांसाठीही हा एक उत्तम पर्याय आहे.