पं. अच्युत केशव अभ्यंकर

102

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक, आकाशवाणी कलावंत पं. अच्युत केशव अभ्यंकर यांनी देश-विदेशात संगीताच्या मैफली रंगवल्या होत्या. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. गायनाचार्य ए. के. अभ्यंकर या नावाने प्रसिद्ध असलेले हे ज्येष्ठ प्रतिभावंत गायक किराणा घराण्यातील गायक पं. फिरोज दस्तुर यांचे ज्येष्ठ शिष्य होते. त्यांच्या निधनाने हजारो तरुण गायकांचे गुरुछत्र हरपल्याची भावना निर्माण होणे स्वाभाविकच आहे.१९६४ साली ठाण्यात स्थायिक झालेले अभ्यंकर हे आकाशवाणी, दूरदर्शनवरील नामवंत कलावंत तर होतेच, एवढेच  नव्हे तर आपल्या अवीट गायकीने त्यांना देश-विदेशातूनही मैफल रंगवण्यासाठी निमंत्रण येत असे. १९९२ ते १९९५ या कालावधीत मुंबई विद्यापीठात ते हिंदुस्थानी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पं. अच्युत अभ्यंकरांच्या तालमीत अनेक  नावाजलेले गायक आणि गायिका तयार झाल्या. विशेषतः ठाण्यातील डॉ. वरद गोडबोले, लीला शेलार, विभावरी बंधगावकर, मधुवंती दांडेकर, प्रणव पटवर्धन  ही त्यातील काही महत्त्वाची नावे अधोरेखित करता येतील. पूर्व ठाणे परिसरात असलेल्या संस्कार भारती, शृंगार संगीत, स्वरदायिनी ट्रस्ट, नादसरिता, संगीत संकल्प, चिंतामणी संगीत सभा अशा विविध संस्थांमध्ये अध्यक्ष अथवा तत्सम महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. अच्युत केशव अभ्यंकर यांनी आपले गुरू फिरोज दस्तुर यांच्या किराणा घराण्याच्या गायकीचा अनमोल ठेवा नव्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवला. संगीत क्षेत्राच्या प्रसार आणि प्रचारासाठी त्यांनी स्वतःला झोकून देऊन समर्पित भावनेने कार्य केले. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा त्यांना प्रदीर्घ काळ सहवास लाभला होता. शास्त्रीय संगीत क्षेत्रात दिलेल्या मौलिक योगदानाबद्दल अभ्यंकर यांना ‘सुरमणी’, ‘गायनाचार्य’, ‘संगीत ऋषी’ या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. २००६ साली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या