समाजसेवेची शिदोरी

>>योगिनी सुरेश लाड

शाळेत असल्यापासून मला समाजसेवा हा विषय आवडायचा… आता तो जोपासण्याचा मनापासून प्रयत्न करतेय.  संसार, नातेवाईकांची उठबस हे सर्व सांभाळून मी माझी आवड जोपासतेय. केवळ आपलाच विचार न करता दुसऱ्यांसाठी मोकळया मनाने आणि निःस्वार्थीपणाने सहकार्य करणे म्हणजे समाजसेवा असं मला वाटतं.

समाजसेवा म्हणजे नेमकं काय हे नीट माहित नाही. पण आपल्याला शक्य होईल त्या गोष्टी समाजासाठी कराव्यात. त्यामुळे मला जे शक्य आहे ते मी करते. परळ येथील सोशल सर्व्हिस लिग दिशातर्फे गाडगे महाराज धर्मशाळेत कर्करोगाचे रुग्ण राहतात. या रुग्णांना आठवडय़ातून एकदा ३ किलो तांदूळ व अर्धा किलो तूरडाळ देते. त्यासाठी आम्ही दानशूर व्यक्तींना आवाहन करुन ‘शिदोरी’ प्रकल्प राबवतो. याबरोबरच परळ विभागातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करत असतो. आदिवासी पाडय़ात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देतो. विकलांग असलेल्यांना दैनंदिन जीवनासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत. पण त्याबाबत त्यांना काहीच माहिती नसते. ती त्यांना देण्याचा प्रयत्न करते. त्यांना मार्गदर्शन करत असते. ज्येष्ठांना ‘ज्येष्ठ नागरिक’ ओळखपत्र मिळण्यासाठी फॉर्म आणून देणे, त्यांना अर्ज भरण्यासाठी मदत करणे ही कामे छोटी असली तरी खूप गरजेची आहेत. महाराष्ट्र शासनाने मला ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ नियुक्त केलंय. त्यामुळे माझ्या घरी सही घ्यायला लोक येतात. प्रत्येक व्यक्तीने आपल्याला जसे जसे तसे सामाजिक काम करावे असे वाटते.

प्रत्येकीचं स्वतःचं असं

वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱ्यांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी,
मुंबई-२५ किंवा backspage१८@gmail.com या ईमेलवरही पाठवता येईल.