नररत्नांची दापोली

>> आशीष बनसोडे

कोकण म्हटलंकी निसर्गाची गर्भश्रीमंती. या गर्भश्रीमंतीत कशाचीही उणीव नाही. विस्तीर्ण समुद्रकिनारा, सोबतीला दरीडोंगर, पशुपक्षी, हिरवळवनराई, वेड लावणारी खाद्यसंस्कृती आणि मोहात पाडणारी कलाकारीया सर्वांचा मिलाप म्हणजे कोकण. कोकणातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याची स्वतःची अशी ओळख आहे. जिथे फिराल तेथे काही ना काही नावीन्य पाहायला आवर्जून मिळते. रत्नागिरी जिह्यातील   दापोली हा त्यापैकीच एक वैभवसंपन्न असलेला तालुका. दापोलीची खासियत काही वेगळीच आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या दापोलीचे रूप काहीसे लपले गेले आहे. त्या लपलेल्या वैभवाला झळाळी देण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.

रत्नागिरी जिह्यातील दापोली हा तसा 118 गावांचा समावेश असलेला विस्तीर्ण तालुका. निसर्ग, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे यापलीकडेदेखील दापोली तालुक्याची वेगळी आणि महत्त्वाची अशी ओळख आहे. पर्यंटनाच्या दृष्टीने परिपूर्ण असलेल्या दापोलीला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिक्षण, साहित्य, समाजकार्य, विचारवंतांचा ऐतिहासिक वारसा दापोलीला लाभलेला आहे. जुनी मंदिरे, मासळीबाजार, विविध समाजांमध्ये असलेली एकोप्याची भावना, तेथे असलेले गड-किल्ले दापोलीच्या सौंदर्यांत अधिक रंग भरतात. असे असूनही या तालुक्याची महती लोकांपर्यंत म्हणावी तितकी पोहचलीच नसल्याचे चित्र आहे. दापोलीचे खरे रूप अजूनही जगासमोर म्हणावे तसे आलेले नाही. या तालुक्याचा उत्तुंग इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी दापोलीचे काही तरुण धडपड करीत आहेत. दापोलीला जागतिक पातळीवर आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. जमाना इंटरनेटचा असल्याने त्यांनी सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाचा आधार घेऊन जास्तीत जास्त प्रमाणात दापोलीची माहिती लोकांसमोर आणण्याचे काम हाती घेतले आहे. दापोलीची अजूनपर्यंत जगासमोर न आलेली माहिती लोकांसमोर आणण्यासाठी किरण बेलोसे, निशा पाटील, सतीश भोसले व दीपक सूर्यवंशी या दापोलीकरांनी ‘तालुका दापोली डॉट कॉम’ नावाने संकेतस्थळ सुरू केले आहे. या पथकाने दापोलीत दडलेल्या आणि इतिहासजमा होऊ लागलेल्या काही बाबींचे संशोधन करून त्यांना डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचे काम हाती घेतले आहे. दापोलीची माहिती सर्वांसमोर आली तरच या तालुक्याचे पर्यटन क्षेत्रात वजन वाढेल आणि पर्यायाने तेथील नागरिकांना रोजगारदेखील उपलब्ध होईल.

रँग्लर, रमाबाई आंबेडकर आणि श्री. ना. पेंडसेचे गाव
हिंदुस्थानातील विश्वविद्यालयीन परीक्षेत नेहमी प्रथम येणारे आणि केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयातील सर्वात कठीण ‘ट्रायपॉस’ पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ‘सीनियर रँग्लर’ हा बहुमान मिळविणारे पहिले हिंदुस्थानी रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे आंजर्लेजवळच्या मुर्डी गावचे. आजही त्यांचे घर आणि त्यांनी बांधलेली शाळा मुर्डी गावाचे वैभव अबाधित ठेवून आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांचेदेखील मुर्डी हेच गाव. अगदी हाकेच्या अंतरावर रँग्लर आणि पेंडसेचे घर आहे. याशिवाय वणंद गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे माहेर आहे. त्या ठिकाणी रमाईचे स्मारक असून ते ऐतिहासिक खजिनाच आहे.

तो पूल ‘गारंबीचा बापू’ कादंबरीतून अजरामर
दापोलीहून साधारणपणे सात कि.मी. अंतरावर आसूद गाव आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना आसूद बाग हे ठिकाण लागते. तेथून उजवीकडे 10 ते 20 मिनिटे चालत गेल्यावर केशवराज हे मंदिर आहे. मंदिराकडे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीतून अजरामर झाला आहे. निसर्गाच्या कुशीतून वाट काढत केशवराज मंदिराकडे जाण्याचा अनुभव काही औरच मज्जा देतो.

मंदिरे, किल्ले आणि मासळीबाजार
दापोलीत केशवराज, मुरूडचे दुर्गा मंदिर, सिद्धपुरुषाची समाधी, आंजर्ले येथील कडय़ावरचा गणपती अशी विलोभनीय व निसर्गाच्या कुशीत वसलेली मंदिरे मनाला शांती देतात. देवदर्शनाबरोबरच मंदिराकडे जाणे हा एक उत्तम अनुभव नक्कीच उत्साहवर्धक आहे. मंदिराव्यतिरिक्त हर्णे येथे भरसमुद्रात वसलेला सुवर्णदुर्गशेजारी असलेला गोवा किल्ला, कनकदुर्ग, फत्तेगड दापोलीच्या सौंदर्यांत आणखी भर पाडतात. दापोलीतील परांजपे वस्तुसंग्रहालयदेखील बघण्यासारखा आहे. येथे नामशेष झालेल्या व नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या वस्तूंचा संग्रह आहे. शिवाय हर्णे समुद्रकिनाऱयावर भरणारा मासळीबाजार बघण्यासारखा असतो. नारळीपोफळीच्या बागा, सुपारीची झाडे असलेल्या डोंगरातून मार्ग काढत एका गावातून दुसऱया गावात जाताना वेगळाच अनुभव येतो. तसेच हर्णे गावाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. या गावाने देशाला रजा, सुजा आणि गाडे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार दिले. एका बाजूला निसर्गाचे सान्निध्य तर दुसऱया बाजूला नजर जाईल तिथपर्यंत विस्तीर्ण समुद्र. तेथील आल्हाददायक वातावरण तर मन अधिक प्रफुल्लित करते. शिवाय कृषी विद्यापीठ हेदेखील दापोलीचे वैभवच आहे. दापोलीत राहण्याचीदेखील उत्तम सोय आहे. या सर्व बाबींचा विचार करता कोकणातील निसर्गाचा खजिना आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दापोलीची सैर करणे गरजेचे आहे.

भारतरत्नांची जन्मभूमी
विधवेशी लग्न करून मुलींसाठी पहिली शाळा काढणारे आणि इथेच न थांबता महिलांना शिकवून त्यांना स्वबळावर उभे करण्याचे काम करणारे महर्षी केशव धोंडो कर्वे हे मुरूडचे. हिंदुस्थानला एकसंध ठेवण्यासाठी व सर्वांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी देशाला राज्यघटना देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संस्कृतचे पंडित असलेले पांडुरंग काणे हेदेखील दापोलीचेच. पांडुरंग काणे यांनी धर्मशास्त्र्ा ग्रंथ लिहिला. दापोलीच्या मुरूड येथे कर्वे ज्या शाळेत शिकले ती शाळा आजही आहे. म्हणून भारतरत्नांची जन्मभूमी अशी ऐतिहासिक ओळख दापोलीची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या