आनंदी आनंद झाला!

> > अभिजित पेंढारकर

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा सण असतो हे तर सगळ्यांनाच माहीत. पण यंदा असं काय वेगळं होतं? दिवाळीसारखी दिवाळी. अभ्यंगस्नान, फराळ, कपडे खरेदी, पाहुण्यांच्या गाठीभेटी, फटाके, वगैरे वगैरे. बाकी सगळं नेहमीचं असलं तरी यंदाचा जल्लोष, उत्साह जरा वेगळाच होता. हा उत्साह होता कोरोनासारख्या संकटावर मात करून, त्याच्या वेगवेगळ्या लाटांवर स्वार होऊन पुन्हा जगण्याचा आनंद सुरू केल्याचा.

दिवाळी जवळ आली आणि सगळी नगरी आनंदून गेली. दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा सण असतो हे तर सगळ्यांनाच माहीत. पण यंदा असं काय वेगळं होतं? दिवाळीसारखी दिवाळी. अभ्यंगस्नान, फराळ, कपडे खरेदी, पाहुण्यांच्या गाठीभेटी, फटाके, वगैरे वगैरे. बाकी सगळं नेहमीचं असलं तरी यंदाचा जल्लोष, उत्साह जरा वेगळाच होता. हा उत्साह होता कोरोनासारख्या संकटावर मात करून, त्याच्या वेगवेगळ्या लाटांवर स्वार होऊन पुन्हा जगण्याचा आनंद सुरू केल्याचा.

शहराच्या विविध भागांना वेगवेगळ्या प्रकारचा आनंद व्यक्त करायचा होता. या वर्षभरात त्यांनी बरंच काही पाहिलं, भोगलं होतं. टेकड्या फारच उत्साहात होत्या. एकतर टेकड्या म्हणजे शहराचं वैभव. शहराच्या गजबजाटात माणसाला कुठे शांतता मिळत असेल तर ती या ठिकाणी. रोज इथे वेगवेगळे कट्टे चालतात, गप्पांच्या मैफली रंगतात. दिवसभरातून ठराविक वेळ काढून मंडळी इथे जमतात. दिवसभरातल्या घडामोडींवर चर्चा होते. अगदी अफगाणिस्तानावर तालिबानचं राज्य आल्यामुळे काय संकट येणार इथपासून ते कोथिंबिरीचे भाव वाढल्यामुळे कोथिंबीर वडीसुद्धा आता कशी अप्राप्य गोष्ट झाली आहे इथपर्यंत. टेकडीवरून शहराचं वेगळं रूप दिसतं, तेही एक आकर्षण.

तुळशीबाग, मंडई, हाँगकॉंग लेन, फॅशन स्ट्रीट वगैरे मोक्याची ठिकाणं तर किती दिवस गिऱ्हाईकांच्या प्रतीक्षेत होती. अगदी दोन रुपयांच्या पिनेपासून वीस हजारांच्या साडीपर्यंत कुठलीही गोष्ट घेताना चालणारी घासाघीस, ‘अमक्यातली तमकी किनार दाखवा‘, ‘ते ढमपं डिझाईन तुमच्याकडे नाही का,‘ ‘याच्यापेक्षा ते मागच्या स्टॅण्डवरचं दाखवता का,‘ अशा चालणाऱ्या रसभरीत चर्चांना आणि अपेक्षांना सगळी दुकानं, गल्ल्या मुकल्या होत्या. ‘बोरवणकरांच्या घरच्या हळदीकुंकवात नेसलेली साडी मला पुन्हा कुठे मिळालीच नाही,‘ ‘यांची बहीण मंगळागौरीला म्हणून माझी नऊवारी घेऊन गेली, तिचं अजून परत करायचं नाव नाही! “ या गप्पाही दुकानांच्या फळ्यांना ऐकू येईनाशा झाल्या होत्या. आधी पूर्ण लॉक डाऊन, मग फक्त सकाळच्या वेळी दुकानं चालू, मग दुपारी चारपर्यंत, मग सातपर्यंत आणि आता पूर्णवेळ दुकानं खुली असे अनेक टप्पे या भागानं बघितले होते.

अनेक दुकानदारांना तर दुपारी चारपर्यंतच दुकानं सुरू ठेवण्याच्या जाचक अटीमुळे एक ते चार, ही हक्काची सुटीही घेता आली नव्हती किंवा त्यात तडजोडी कराव्या लागल्या होत्या. काही जणांनी मात्र व्यवसायावर होत असलेल्या परिणामांची चिंता न करता, सकाळी 10 ते 4 या वेळेतही एक ते चार अशी दुपारची हक्काची सुटी घेऊन आपली निष्ठा व्यक्त केली होती. एकूणच गिऱहाईकांची गर्दी बघून बाजारपेठेला मात्र मनमुराद आनंद झाला होता.

बागा छोट्या दोस्तांना अंगाखांद्यावर खेळवण्यासाठी किती दिवसांपासून आसुसल्या होत्या. मुलं तिथल्या हिरवळीवर बागडायला लागली आणि बागा त्यांना टाळ्या देत मनातून सुखावल्या. त्यांच्याबरोबर खिदळायला, उड्या मारायला लागल्या. मॉर्निंग वॉक करणारे वेगवेगळे ग्रुप्सही बरेच दिवस बागेपासून वंचित होते. स्ट्राव्हा, सॅमसंग हेल्थ, यांव नि त्यांव apps वर टीचभर व्यायामाचे ढीगभर फोटो काढून टाकणारे काही होते, काही मनापासून घाम गाळणारे होते, एखाद्या धावणाऱ्या मध्यमवयीन व्यायामपटूमध्ये आपल्या मनातला मिलिंद सोमण किंवा मलायका अरोरा शोधणाऱ्या किंवा शोधणारेही होते. बागेतल्या जमिनीवरच्या हिरवळीपेक्षा ट्रकवरून धावणारी ही हिरवळ जास्त आकर्षित करत होती.

मुख्य रस्ते जसे गर्दीने गजबजून गेले, तसेच पार्किंगसाठी राखीव ठेवलेल्या आणि आधी अगदी रिकाम्या वाटणाऱ्या जागाही ओसंडून वाहू लागल्या. जेवणाच्या पंगतीत एखादी खुर्ची रिकामी झाल्यावर लगेच ती झडप घालून पटकावण्याच्या कौशल्यात तरबेज झालेली मंडळी इथे रस्त्यावर पार्किंगसाठी बरोबर दुसऱ्या गाडीची जागा मिळवण्यातही वाकबगार होतीच. मधल्या काळात त्यांच्या या कौशल्यावर चढलेला गंज आता उतरला आणि ते कौशल्य पुन्हा लखाखलं.

ग्रंथालयांमध्ये वर्दळ वाढली, धूळ खात पडलेल्या पुस्तकांना नवी घरं दिसू लागली. ऑनलाइन स्वरूपात पुस्तकांना मागणी होती, पण वाचकांनी स्वतः हाताळून, पानापानाचे लाड करून ती खरेदी करण्याचा आनंद दुकानांमधली पुस्तकं मिळवू लागली. वाचकांच्या सहवासात खऱ्या अर्थानं आनंदली. थिएटर्स मात्र अजूनही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत होती. एकतर अलीकडच्या काळात त्यांच्यावर एकामागून एक संकटं येतच होती. प्रेक्षकांची संख्या रोडावली होती. लॉकडाऊनच्या काळात अगदी सोयीची कॉर्नर सीट पकडून आपल्या वेगळ्याच सिनेमाचा आनंद घ्यायला आलेले प्रेमी जीवसुद्धा दिसेनासे झाले तेव्हा मात्र थिएटर्स खऱ्या अर्थानं सैरभैर झाली. नाटकांच्या पडद्यांवर आणि प्रेक्षागृहांतल्या खुर्च्यावर धूळ साठली. दिवाळी जवळ आली तशी ती हळूहळू झटकली जाऊ लागली,

सगळ्यात जास्त आनंद झाला होता, तो सगळ्या फुटपाथना. कित्येक संसार चालवणाऱ्या छोट्या पथाऱ्या, वडापाव, पावभाजीच्या गाड्या, फूल विक्रेते, खेळणी विकणारे, फुगेवाले, अशा कित्येकांना पोट भरण्यासाठी संधी देणारं हे ठिकाण. बंधनं सैल झाली आणि त्यांचे इथले ऋणानुबंध घट्ट झाले. भुकेल्या जिवांच्या पोटात दोन वेळचं पुरेसं अन्न जाऊ लागलं. त्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी झाली आणि अवघ्या शहरानं उत्साहानं नवा श्वास घेतला!

[email protected]