साहित्य सोहळा – एक आगळंवेगळं संमेलन

>> अनिता पाध्ये

नाटय़क्षेत्रात प्रसिद्ध असलेले मुळ्येकाका त्यांच्या आगळ्यावेगळ्या संमेलनांविषयी प्रसिद्ध आहेतच. नुकतेच त्यांनी अनुवादकार व शब्दांकनकार यांचं एक अनोखं संमेलन आयोजित केलं होतं. त्याविषयी..

मुळ्येकाका, पांढरे मुळ्ये, रोखठोक मुळ्ये अशा अनेक संबोधनांनी लोकप्रिय असलेले अशोक मुळ्ये यांच्या भन्नाट डोक्यातून कायमच वेगवेगळ्या कल्पना येत असतात. कधी मतिमंद अपत्यांच्या पालकांचा कार्यक्रम करण्याची कल्पना तर कधी रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेची व्यथा जनतेपर्यंत पोहोचवणारा, तिचं मनोधैर्य वाढवण्यासाठी केलेला कार्यक्रम. काही वर्षांपासून त्यांनी ‘माझा पुरस्कार’देखील सुरू केला आहे (ज्यासाठी अजून त्यांना मी योग्य वाटली नसावी….अर्थाने हा उल्लेख गमतीने).

मुळ्येकाकांशी माझा परिचय नाटय़ निर्माता सुधीर भट यांच्यामुळे झाला. जवळपास 1991-92 सालची गोष्ट असावी ही. पहिल्याच भेटीत त्यांचा रोखठोक स्वभाव, रुक्ष बोलण्यामध्येदेखील असलेला एक प्रकारचा मिश्कीलपणा, प्रामाणिकपणा लक्षात आला होता. सफेद शर्ट आणि सफेद पॅन्ट हा त्यांचा पेहरावदेखील प्रथमदर्शनी नजरेत भरणारा. कालपरत्वे परिचय वाढत गेला आणि अशोक मुळ्ये अन्य जणांसारखे माझ्यासाठीसुद्धा मुळ्येकाका बनले. गेली काही वर्षे नाटय़क्षेत्रापासून ते थोडे अलिप्त झाले आहेत. स्वतःचा फ्लॅट आहे, दरमहा दोनवेळच्या जेवणाची ददात नाही आणि चालू वय 79! अशा वयात स्वस्थ बसून आपल्याला हवं ते करण्याकडे, स्वतःसाठी जगण्याकडे माणसाचा कल असतो, पण अशोक मुळ्ये असा विचार करू लागले तर त्यांच्यात व अन्य व्यक्तींमध्ये काय फरक राहील? सतत काही नवं, वेगळं, पण ते अत्यंत निःस्वार्थीपणे करण्याचा त्यांचा स्वभाव. त्यामुळेच कदाचित गेली काही वर्षे मुळ्येकाकांनी विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक कार्य करण्याचा ध्यास घेतला आहे. या कार्यक्रमांचा हेतू स्वतःची प्रसिद्धी नसून सामाजिक बांधीलकी आहे हे समोरच्या माणसाला जाणवत असल्याकारणाने खिशात पैसे न खुळखुळणाऱया मुळ्येकाकांच्या या सर्व कार्यक्रमांना समाजातील अनेक भली माणसं आर्थिक सहाय्य करण्यासाठी पुढे येत असतात. मुळ्येकाकांनी नाती, माणसं जपली असल्याने त्यांच्या कार्यक्रमांना मुद्दाम गर्दी जमवण्याची वेळ कधीही येत नाही.

‘‘तुला यायचं आहे हां, मी अमका अमका कार्यक्रम करतोय…’’ असं फोन करून मुळ्येकाका कुठल्याही नामी, नवगत व्यक्तीला सांगतात आणि ती व्यक्ती त्यांच्या प्रेमाखातर कार्यक्रमाला उपस्थित राहते. ‘‘अनिता, मी अनुवादकार व शब्दांकनकार यांचं एक संमेलन करतोय 21 जानेवारीला. ये आणि बोल तुझ्या पुस्तकांबद्दल.’’, असा फतवा फोनवर घोषित करत मुळ्येकाकांनी फोन ठेवला. मुळ्येकाकांना नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. 21 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता दादर माटुंगा कल्चरलच्या तळमजल्यावरील हॉलमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली.ज्येष्ठ अनुवादकार जोसेफ तुस्कानो, सुनीता परांजपे, प्रकाश भातंब्रेकर, जयश्री हरी जोशी अशा ज्येष्ठ अनुवादकारांसह नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱया प्राजक्ता उजगरे, संकेत म्हात्रे, वज्रेश सोलंकी, गीतेश शिंदे, अक्षय शिंपी आदी अनेक अनुवादकार, जयश्री देसाई, मुकुंद कुळे, प्रा. नितीन आरेकर असे माझ्यासह काही शब्दांकनकार या संमेलनाला उपस्थित होते.

नेहमीप्रमाणेच मुळ्येकाकांनी आयोजित केलेल्या या संमेलनामध्ये कसलीही औपचारिकता नव्हती तर अतिशय कौटुंबिक स्तरावरची वैचारिक देवाणघेवाण होती. अनुवादकारांच्या पहिल्या सत्रामध्ये जर्मन कवितांचा अनुवाद करणाऱया जयश्री जोशींनी सांगितले की, जर्मन कवितेमध्ये लेखिकेने ‘उंदीर’ हा शब्द मुलायम, सकारात्मक पद्धतीने वापरला असला तरी त्या कवितेचा मराठीमध्ये अनुवाद करताना ‘उंदीर’ऐवजी ‘सशा’चं उदाहरण द्यावं लागलं, तर अनेक मराठी साहित्य हिंदीमध्ये अनुवाद करणाऱया श्रीमती सुनीता परांजपेंना ‘गालावरच्या खळी’साठी योग्य हिंदी शब्द सापडत नसल्याने त्या कशा अस्वस्थ झाल्या होत्या आणि ‘माचीस’ चित्रपटातील ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी लिहिलेल्या ‘छोड आए हम’ या गाण्यातील ‘हॅंसे तो दो गालों में भंवर पडा करते थे’ ही ओळ ऐकल्यावर परांजपेबाईंनी ‘गालावरच्या खळी’साठी ‘भंवर’ हा शब्द वापरला होता, हा गमतीदार प्रसंग सांगितला.

प्रकाश भातंब्रेकरांनी आपल्या सोप्या, सहज भाषेतील अनुवादाचे रहस्य उलगडले. दुसऱया सत्रामध्ये गीतेश शिंदे, वज्रेश सोलंकी या मराठी, कोंकणी, गुजराती अनुवादकारांनी त्यांचे अनुभव श्रोत्यांसह शेअर केले. संकेत म्हात्रे यांनी बहुभाषिक मंचावरून आपले अनुभव सांगून दाद मिळवली. ज्येष्ठ पत्रकार व अनुवादकार जयश्री देसाईंनी जावेद अख्तर, कैफी आझमी यांच्या कविता मराठीमध्ये अनुवादित करताना आलेले छान अनुभव शेअर केले, तर अनेक दिग्गजांच्या वृत्तपत्रीय लेखांचे शब्दांकन करणाऱया मुकुंद कुळेंनी सदर लेखांखाली शब्दांकनकार म्हणून आपले नाव का दिले नाही याचा उलगडा केला. लोकप्रिय विनोदवीर व दिग्दर्शक दादा कोंडके व स्वतःचं वेगळं, अव्वल स्थान निर्माण करणाऱया विजय ऊर्फ गोल्डी आनंद यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकांचे शब्दांकन करत असताना आलेले अनुभव मी प्रेक्षकांसमोर सादर केले. प्रा. नितीन आरेकरांनी आपले अनुभव सांगून रंगत आणली. मकरंद जोशी व नेहा सावंत या दोघांनी शब्दांकनकार व अनुवादकार म्हणूनही आपले अनुभव सांगितले.

या संमलनात ‘नवाकाळ’ या वृत्तपत्राच्या शतकपूर्तीची दखल या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱया संपादिका श्रीमती जयश्रीताई खाडिलकर-पांडे यांचा ‘एबीपी माझा’चे प्रमुख संपादक श्री. राजीव खांडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. नितीन आरेकर व पद्मगंधा प्रकाशनच्या अनुवादित दिवाळी मासिकाचे संपादन करणाऱया अभिषेक जाखडे यांचा सत्कार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. या संमेलनादरम्यान सर्वांचे आभार मानण्याच्या निमित्ताने काय ते मुळ्येकाका काही मिनिटं व्यासपीठावर अवतरले होते. अन्यथा संपूर्ण कार्यक्रम सुरू असेपर्यंत उपस्थित प्रमुख पाहुणे व प्रेक्षकांना चहा मिळाला का, याकडे ते जातीने लक्ष देत होते. ही व्यवस्था रवींद्र आवटी यांनी केली होती. कसलाही बडेजाव नाही, काही वेगळं करत असल्याची फुशारकी नाही. त्यामुळे या अवलियाने भरवलेले अनौपचारिक पद्धतीचे अनुवादकार व शब्दांकनकारांचे हे अनोखे व पहिले संमेलन यशस्वी झाले नसते तरच नवल!
[email protected]