>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
बांगलादेशने अल कायदाशी संलग्न असलेल्या अन्सारुल्ला बांग्ला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख जशिमुद्दीन रहमानी याची तुरुंगातून सुटका केली आहे. त्याच्या सुटकेने भारताला धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तान आणि चीनने बांगलादेशची उग्रवादी पार्टी जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश सरकारशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. बांगलादेशमध्ये चाललेल्या हिंसाचाराचा आणि सत्ताबदलाचा फायदा घेऊन हे दोन्ही देश बांगलादेशचे महत्त्वाचे मित्र म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताकरिता ही एक धोकादायक घटना आहे.
बांगलादेशमधील सध्याचे सरकार आणि जमात-ए-इस्लामी या कट्टरपंथी संस्थेने शेकडो बांगलादेशी हिंदूंना सरकारी नोकरीतून हटवले आहे. बांगलादेशी हिंदू शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. मोहम्मद युनूस यांनी सूत्रे सांभाळल्याने बांगलादेशातील जनजीवन पूर्ववत होईल असे वाटले, पण अद्यापही बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना होत आहेत, हिंदू धर्मीयांना लक्ष्य केले जात आहे. आतापर्यंत हिंसाचारामुळे एक हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
बांगलादेश सरकारने इस्लामिक कट्टरतावादी जमात-ए-इस्लामीवर घातलेली बंदी उठवली आहे. त्यासोबतच जमातच्या विद्यार्थी संघटनेवरूनही बंदी उठवण्यात आली आहे. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सत्तापालटात जमातचा मोठा हात आहे. पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यावर पूर्णपणे बंदी घातली होती. आदेशात म्हटल्याप्रमाणे, बांगलादेश जमात-ए-इस्लामी आणि तिची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र शिबीर यांचा दहशतवाद आणि हिंसाचारात सहभाग नाही. त्यामुळे बंदी उठवण्यात आली आहे. युनूस सरकारमध्ये जमातला सामील करण्यात आले आहे. सध्या बांगलादेशातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जमातचे नेते मोठा हस्तक्षेप करत आहेत.
बांगलादेशने अल कायदाशी संलग्न असलेल्या अन्सारुल्ला बांग्ला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख जशिमुद्दीन रहमानी याची तुरुंगातून सुटका केली आहे. रहमानी याला 2013 मध्ये ब्लॉगर अहमद राजीव हैदरच्या हत्येत दोषी ठरवले होते. एबीटी हा बांगलादेशमधील एक स्वदेशी अतिरेकी गट आहे. बांगलादेशातील अनेक ब्लॉगर, लेखक आणि समलिंगी अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्येमागे या गटाचा हात आहे. त्याच्या सुटकेने भारताला धोका निर्माण झाला आहे. जशिमुद्दीन रहमानी हा एबीटीचा आध्यात्मिक गुरू आहे. एबीटीच्या सदस्यांनी अल कायदाच्या अन्वर अल अव्लाकीकडून प्रेरणा घेतली होती. 2010 साली येमेनमध्ये इस्लामी धर्मोपदेशक अल अव्लाकी मारला गेला. 2012 मध्ये या संघटनेने आपल्या गटात तरुण-तरुणींना भरती करण्यास सुरुवात केली. एबीटी संघटनेची विचारधारा पुढे नेण्यासाठी आणि दहशतवादी हल्ले कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. रहमानी अल कायदाचा उघड समर्थक आहे.
रहमानी याच्या नेतृत्वाखालील एबीटीवर 2013 ते 2016 दरम्यान अविजित रॉय, ओयासिपूर रहमान बाबू, अनंता बिजॉय दास आणि राजशाही विद्यापीठाचे प्राध्यापक एकेएम शफीऊल इस्लाम यांच्यासह अनेक ब्लॉगर आणि लेखकांच्या हत्येचा आरोप आहे. 2016 मध्ये शेख हसीना सरकारने दहशतवादी आणि राज्यविरोधी कारवायांमुळे एबीटीवर बंदी घातली होती. या गटाने अन्सार अल इस्लाम या नवीन नावाने आपली संघटना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला, परंतु 2017 मध्ये त्यावर पुन्हा बंदी घालण्यात आली. बांगलादेशी वंशाचा अकायेद उल्लाह हा रहमानी याच्यापासून प्रेरित आहे. त्याने न्यूयॉर्क शहरात बॉम्बहल्ला घडवून आणला होता.
एबीटी भारतात जिहादी नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने अनेक एबीटी दहशतवाद्यांना अटक केली आहे. मेमध्ये आसाम पोलिसांनी गुवाहाटी रेल्वे स्थानकावर एबीटीशी संबंध असलेल्या बहर मिया, क्वचित मिया अशा दोन दहशतवाद्यांना अटक केली. एबीटीने भारताच्या ईशान्य भागात दहशतवादी हल्ले करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाशी (एलईटी) संबंध जोडला होता. पाकिस्तानी दहशतवादी गट एलईटी 2022 मध्ये एबीटीच्या संपका&त आला, त्यांनी भारतात हल्ले सुरू करण्याच्या उद्देशाने बंगालमध्ये आपले केंद्र स्थापन केले. सुमारे 50 ते 100 एबीटी अतिरेकी त्रिपुरामध्ये घुसखोरीची योजना आखत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे की, एबीटी दिशाभूल करण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाची उपकरणे वापरत आहे.
ढाका येथील व्हिसा केंद्रावर स्थानिकांनी व्हिसा मिळण्यात विलंब झाल्याने संताप व्यक्त केला. शेख हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेशात भारतविरोधी द्वेषाची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. यापूर्वी बांगलादेशातील स्थानिकांनी आरोप केला होता की, भारताने जाणीवपूर्वक त्रिपुरामधील धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे बांगलादेशात पूरस्थिती निर्माण झाली. ‘‘भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता धरण उघडून अमानुषता दाखवली.’’ अर्थात हे असत्य आहे.
पाकिस्तान आणि चीनने बांगलादेशची उग्रवादी पार्टी जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश सरकारशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. बांगलादेशमध्ये चाललेल्या हिंसाचाराचा आणि सत्ताबदलाचा फायदा घेऊन हे दोन्ही देश बांगलादेशचे महत्त्वाचे मित्र म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताकरिता ही एक धोकादायक घटना आहे. बांगलादेशमधून यापुढील काळात निर्वासितांचा लोंढा भारतात येऊ शकतो आणि तो रोखण्यासाठी भारताला प. बंगाल सीमा सुरक्षित करावी लागेल.
शेख हसीना यांना सत्तेवरून हटविण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानपुरस्कृत जमात-ए-इस्लामीचा वापर केल्याचे दिसते. त्यामुळे जमात-ए-इस्लामीला बांगलादेशमध्ये डोके वर काढू न देण्यासाठी भारताला खूप प्रयत्न करावे लागतील. बांगलादेशमध्ये झालेल्या सत्ताबदलामुळे भारताला मात्र एक फायदा नक्कीच झाला आहे, तो म्हणजे भारतीय वस्त्राsद्योगाला तेजी येत आहे. कापड, सुताच्या दरात वाढीचा कल दिसून येत आहे. केंद्र सरकारने या स्थितीचा फायदा उठविण्यासाठी निर्यात धोरण उद्योगपूरक करण्याची गरज आहे. निर्यात वाढली तर देशी कापड उद्योगाला तेजी येईल. थोडक्यात, भारताने साम-दंड-भेद या नीतीचा वापर करून बांगलादेशात हिंदूंचे आणि आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करायला पाहिजे.