लेख – खलिस्तानवादाला पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न

801

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

हिंदुस्थानातील खलिस्तान चळवळ संपुष्टात आलेली असली तरी जगातील अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड येथे काही खलिस्तानवादी उग्रवाद्यांची चळवळ मधूनमधून सुरू असते. हिंदुस्थानला अस्थिर व अशांत करण्यासाठी पाकिस्तान या खलिस्तानवाद्यांचा वापर करण्याची शक्यता होती. ती संधी कर्तारपूर मार्गिकेच्या निमित्ताने पाकिस्तान घेईल आणि पंजाबात खलिस्तान चळवळीचे पुनरुज्जीवन करेल अशी भीती आहे.

हिंदुस्थानातील शीख भाविकांना कर्तारपूर येथे दर्शनासाठी जाता यावे यासाठी मार्गाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सहा दशकांहून अधिक काळ होत होती. मार्गिकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कर्तारपूर येथे जी भित्तिपत्रके लावण्यात आली त्यावर खलिस्तानी हिंसाचाराचा प्रमुख जर्नेलसिंग भिंद्रनवाले तसेच अन्य शीख दहशतवाद्यांची छायाचित्रे ठळकपणे होती. पाकिस्तानच्या मनात नेमके काय आहे हे या घटनेवरून उघड होते.

गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिखरावर पोहोचला असताना पाकिस्तानला ही सुबुद्धी आताच का सुचली? त्यामुळेच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी हिंदुस्थानात खलिस्तानची चळवळ पुन्हा सुरू करण्यासाठी पाकिस्तान या कर्तारपूर मार्गिकेचा वापर करण्याची शक्यता असल्याची शंका व्यक्त केली आहे. जगातील शिखांनीही अशी भीती व्यक्त केली आहे. याचे कारण पाकिस्तानात आश्रयास असलेला खलिस्तानवादी नेता गोपालसिंग चावला या प्रकरणात फार सक्रिय आहे. हिंदुस्थानातील खलिस्तान चळवळ संपुष्टात आलेली असली तरी जगातील अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड येथे काही खलिस्तानवादी उग्रवाद्यांची चळवळ मधूनमधून सुरू असते. हिंदुस्थानला अस्थिर व अशांत करण्यासाठी पाकिस्तान या खलिस्तानवाद्यांचा वापर करण्याची शक्यता होती. ती संधी कर्तारपूर मार्गिकेच्या निमित्ताने पाकिस्तान घेईल आणि पंजाबात खलिस्तान चळवळीचे पुनरुज्जीवन करेल अशी भीती आहे.

शीख आणि हिंदूंचे विभाजन अटळ आहे या जुन्या धोरणांवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना विश्वास वाटतो. शिखांना हिंदुस्थानपासून वेगळे करण्याची पाकिस्तानची कुटील कल्पना 1950च्या दशकापासून सुरू आहे, जेव्हा फाळणीची जखम एकदम ताजी होती. पाकिस्तानने या दिशेने पाहिले पाऊल हे 1960 च्या दशकात उचललं होतं. 1960 मध्ये आणि 1981-84 च्या दरम्यान दोनदा केलेले प्रयोग अयशस्वी ठरले आहेत. विदेशांमध्ये असलेल्या शीख संघटनांमध्ये, विशेषकरून कॅनडातील संघटनांना पाकिस्तानच्या अनिवासी समूहाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. त्यांना कश्मिरी समूहांसोबत जोडलं जात आहे.

ही मार्गिका हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील नागरिकांचा परस्पर संपर्क यावा आणि त्यातून दोन्ही देशांच्या शांततामय सहजीवनाला चालना मिळावी अशा उदात्त हेतूने तयार करण्यात आली असली तरी हे खोटे आहे हे पाकने दाखवून दिले. या मार्गिकेचा उपयोग करून हिंदुस्थानातून प्रतिदिन पाकिस्तानात पाच हजार यात्रेकरूंना जाण्याची अनुमती मिळणार आहे. या यात्रेकरूंमध्ये प्रामुख्याने शीख भाविक आहेत. हे भाविक मोठय़ा संख्येने पाकिस्तानात पोहोचल्यावर त्यांच्या मनात फुटीरतेची भावना निर्माण व्हावी याचा पुरेपूर प्रयत्न पाककडून होणार आहे. भिंद्रनवालेसारख्या दहशतवाद्यांचा आधार घेतल्यामुळे कर्तारपूर मार्गिकेमुळे दहशतवादाला खतपाणी मिळू शकते. 80 आणि 90 च्या दशकांमध्ये पाकपुरस्कृत फुटीरतावाद व दहशतवाद पंजाबमध्ये उफाळला होता. शेकडो लोकांचे त्यात बळी गेले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बळीही शीख दहशतवादानेच घेतला. मात्र पंजाब पोलीस आणि हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या दहशतवादविरोधी अभियानामुळे हा दहशतवाद रोखण्यात हिंदुस्थानला यश आले. पाकिस्तानला शीख समुदायासंबंधी कोणतीही आपुलकी नाही. पाकिस्तानचे नागरिक असणाऱया शिखांचे जीवन तेथे सुरक्षित नाही. त्यांच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव नेहमी टाकला जातो. हिंदू मुलींप्रमाणे शीख मुलींचेही अपहरण केले जाते. त्यांचे सक्तीने धर्मांतर करून त्यांचा निकाह मुस्लिम माणसांशी लावला जातो. गेल्या काही महिन्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे घडली आहेत. शिखांची पाकिस्तानातील लोकसंख्याही झपाटय़ाने कमी होत आहे. स्वतःच्या देशात शीख समुदायाला अशी अमानुष वागणूक देणारा पाकिस्तान हिंदुस्थानातील शीख समुदायासंबंधी मात्र भलताच पुळका दाखवत आहे. हे कारस्थान देश आणि शीख समुदाय यांनी समजून घेणे आवश्यक आहे. खलिस्तानवाद्यांनी खलिस्तानच्या संदर्भात जनमतसंग्रह (प्लेबिसाईट) घेण्याची योजना आखली आहे. 2020 पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. हिंदुस्थानातील शिखांमध्ये खलिस्तानच्या समर्थनार्थ भावना निर्माण करणे कठीण काम होते. आता हे शीख कर्तारपूर येथे अनायासे येणार आहेत. तिथे आल्यावर त्यांच्या मनात स्वतंत्र खलिस्तानचे बीजारोपण करणे पाकिस्तानला सोपे जाणार आहे. खलिस्तान निर्मितीसाठी बहुसंख्य शिखांची संमती मिळताच हे खलिस्तानवादी संयुक्त राष्ट्रसंघात जाऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी करतील. हिंदुस्थाननिष्ठ शिखांना जी भीती वाटत आहे ती निराधार नाही.

‘खलिस्तान सार्वमत 2020 चे आयोजन’ ही योजनाही फसणार हे निश्चितच आहे. सुरक्षा यंत्रणांनी अतिशय सावध असणे आणि सुरक्षेच्या मुद्दय़ांवर सदैव सजग असणे अनिवार्य आहे. कर्तारपूरला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या शीख भाविकांना पाकिस्तान कोणता संदेश देतो, त्या संदेशाचा परिणाम त्यांच्यावर काय होतो याकडे आता सुरक्षा यंत्रणांना लक्ष ठेवावे लागणार. त्यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर यंत्रणा सज्ज असतील. भाविकांना प्रबोधनाच्या माध्यमातूनही पाकचे डावपेच आणि कटकारस्थाने याबद्दल अवगत करावेच लागेल. देशहितालाच प्राधान्य देऊन कठोर निर्णय घेऊन पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करावा लागला तर तसेही करण्याची आणि पुन्हा एकदा मोठं नुकसान पाकिस्तानला सोसवण्याची तयारी असावयास हवी. कर्तारपूर मार्गिका उघडून हिंदुस्थानने मोठा धोका पत्करला असून संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्जता आतापासूनच ठेवावयास हवी.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या