आरोग्यवर्धक आलं

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

आलं हे फार औषधी आहे. आलं कर्करोगाच्या पेशींच्या वाढीमध्ये हस्तक्षेप करते आणि त्यांच्या वाढीस प्रतिबंध करते.

 खूप दमून घरी यायचे आणि आल्याचा चहा प्यायचा यासारखे स्वर्गसुख नाही. आले हजारो वर्षांपासून स्वयंपाकाचा मसाला म्हणून वापरले जाते. मळमळ होत असेल तर विश्वसनीय उपाय म्हणून तसेच डोकेदुखी आणि सांधेदुखी यासाठीदेखील याचा फायदा होतो.

हळदीप्रमाणेच आल्यामध्ये समान ऑण्टिऑक्सिडेंट आणि दाहकविरोधी प्रभाव असतात. एका अभ्यासात असे आढळून आले की, आले स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते आणि सामान्य पेशींना हानी पोहोचवत नाही. ही प्रक्रिया निवडक सायटोटॉक्सिसिटी म्हणून ओळखली जाते.

 अजून पुढे अभ्यासाची गरज असताना आजही अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, आले स्तन, प्रोस्टेट, कोलन, यकृत आणि फुप्फुसांसह अनेक प्रकारचे कर्करोग रोखू शकते.

 तुम्ही ते कसेही ‘वापरले’ तरीही ही गोड आणि मसालेदार औषधी वनस्पती तुमच्या कर्करोग संरक्षणात्मक आहाराचा भाग असावी हे नक्की! सध्या कार्सिनोजेन्स आणि विषारी पदार्थ सर्वत्र लपलेले असतात. हवेतील पर्यावरणीय प्रदूषणापासून ते आपण जे अन्न खातो त्यामध्ये जड धातू आणि रसायने असतात.

 काही विषाचे ओझे कमी करण्यासाठी, चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि आदर्शपणे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक, नैसर्गिक पोषक तत्त्वे अस्तित्वात आहेत, त्यातील एक आले आहे.

 कसे खावे? 

रेसिपीमध्ये ताजे किंवा पावडर केलेले आल्याचे रूट वापरू शकतो. ताजे आले चिरून घ्या. सॅलड ड्रेसिंगमध्ये वापरू शकतो. त्याचा रस उत्साहवर्धक ‘आले शॉट’ या स्वरूपात घेऊ शकतो. अगदी ताजेतवाने वाटावे म्हणून चहामध्ये घालू शकतो.