>> दिलीप ठाकूर
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल वातावरणात कदाचित अनेकांना माहीत नसेल साधारण ऐंशीच्या दशकापर्यंत इराणी हॉटेलमधील ज्युक बॉक्समध्ये आठ आण्याचे नाणे टाकून आपल्या आवडते चित्रपट गीत ऐकावयास श्रोते विलक्षण उत्सुक असत. पानी कम चहा आणि बन मस्काचा आनंद घेत घेत आपले व इतरांनीही नाणे टाकलेले गाणे ऐकण्यात मौज होती. त्याही मागे जाऊन सांगायचे तर साठच्या दशकात मध्यमवर्गीय कुटुंबात घरी रेडिओ विकत आणला तरी तो पाहायला अख्खी चाळ जमे आणि यजमान चिमूटभर साखर वाटत. सत्तरच्या दशकात टेपरेकॉर्डरला महत्त्व आले आणि आपल्याला आवडलेली अनेक गाणी ध्वनिफितीत भरून घेतली जात.
हे का सांगतोय, तर आजच्या यूटय़ूब युगातही पुन्हा रेडिओला महत्त्व आले आहे. सतत उपग्रह वाहिनीवर अथवा यूटय़ूबवर नजर ठेवू शकत नाहीत. घरात असो, कार्यालयात असो, प्रवासात असो, एखाद्या पार्टीत असो ‘ऐकणे’ शक्य आहे आणि हेच लक्षात घेऊन आता अनेक खासगी रेडिओ स्टेशन कार्यरत आहेत. त्यात ‘म्युझिक मंकी’ या संस्थेचे सर्वेसर्वा सचिन चव्हाण यांनी चित्रपट निर्मिती, व्हिडीओ अल्बम (एकेका गाण्याचे इंग्लंडमधील विविध स्थळांवरचे चित्रीकरण), याबरोबरच ऑडियो गीत यालाही महत्त्व दिले आहे.त्यात नृत्य दिग्दर्शक रेमो फर्नांडिस मुख्य सहकारी आहेत. आता रेमो फर्नांडिस म्हटले की, पटकन त्यांची ‘धूम’, ‘गुड बॉय बॅड बॉय’, ‘जस्ट मॅरिड’, ‘प्यार का पंचनामा’ अशा अनेक चित्रपटांतील नृत्ये डोळ्यांसमोर येतात. आपण नृत्य दिग्दर्शक आहोत याचे भान ठेवून त्यांनी गीत संगीत व नृत्य यांना भरपूर स्कोप मिळेल अशा ‘एनी बडी कॅन डान्स’ ( पहिला व दुसरा), ‘फालतू’, ‘स्ट्रीट डान्सर’ इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलेली गाणी पुन्हा स्वतंत्रपणे रेडिओवरही ऐकावयास मिळणार हे याचे वैशिष्टय़ आहे.
म्हणजेच दृश्य माध्यमाकडून पुन्हा श्रोत्यांपर्यंत गाणे पोहोचवणे अशी ही कल्पना आणि आज मोठय़ा शहरापासून काही जिह्यांत स्थानिक रेडिओ स्टेशन कार्यरत आहेत. जे तीन-चार जिह्यांतील रसिकांपर्यंत पोहोचते तसेच माळरानावरही ऐकले जाते. रेडिओ माध्यमाकडे मधल्या काळात बरेच दुर्लक्ष झाले होते. घरातील दूरचित्रवाणीवर, उपग्रह वाहिन्या आणि ओटीटीवर मोठय़ा प्रमाणावर दर्शक रमल्याचा व्यावसायिक समज होता. आजच्या काळात कोणतीही नवीन गोष्ट करण्यापूर्वी ‘मार्केट सर्व्हे’ केला जातो. चित्रपट गीते, अनेक वेगवेगळी गाण्यांचा ‘श्रोता’ वाढतोय. ‘म्युझिक मंकी’च्या निमित्ताने हे ‘ऐकायला’ मिळाले म्हणून तुम्हाला सांगितले.
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत.)