गुण आणि यश

प्रातिनिधिक फोटो

>> डॉ. ऋृतु सारस्वत

दहावी-बारावीचे निकाल जाहीर होताच दरवर्षी अनेक विद्यार्थी मनासारखे गुण न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत जातात आणि काही जण आपला जीवन प्रवास थांबवतात. आपली सामाजिक व्यवस्था आणि परीक्षा पद्धत ही विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरतेय आणि ही बाब क्लेषदायक नाही का? आपल्या शिक्षण व्यवस्थेने यशाचा अर्थ गुणकेंद्री बनवून संकुचित केला आहे. तसेच आपली विचारसरणी ही शाळेत शिकवल्या जाणाऱया पाठय़पुस्तकातील धडय़ांवर अवलंबून असते आणि त्यात आयुष्यभर घुटमळत राहते. गुण आणि जीवघेण्या स्पर्धेतून बाहेर काढत शालेय शिक्षण पद्धतीला नवीन रूप देणे गरजेचे आहे.

आजकाल दहावी आणि बारावी परीक्षेत मुलांना पडणारे गुण पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. 90 ते 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱया पाल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जाते. त्याच वेळी 60 ते 70 टक्के गुण मिळवणाऱया मुलांना पालकांची बोलणी ऐकावी लागतात. एकूणातच गुणांवरून मुलगा हुशार आहे की अकार्यक्षम आहे, मठ्ठ आहे याचे मोजमाप केले जाते. आजमितीला नापास होणाऱयांचे प्रमाण कमी असले तरी कमी गुण मिळवणाऱया मुलांना अधिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते हे तितकेच खरे. परीक्षेतील गुण, टक्केवारी ही यशाचे मोजमाप करणारी अचूक यंत्रणा आहे का? याचे उत्तर नकारार्थीच येईल.

सीबीएसई किंवा स्टेट बोर्डाच्या परीक्षेच्या निकालावरून तज्ञांकडून काढण्यात येणारे निष्कर्ष हे गुणवत्तेबाबत सत्यतेच्या जवळ जातात, असे ठोसपणे म्हणता येत नाही. त्याच वेळी बुद्धिजीवी वर्ग मात्र एका गोष्टीवरून नेहमीच धास्तावलेला असतो आणि ती धास्ती काही अंशी खरीही ठरते, ती म्हणजे निकालानंतर विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे चुकीचे निर्णय. निकाल जाहीर होताच दरवर्षी अनेक विद्यार्थी मनासारखे गुण न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत जातात आणि आपला जीवन प्रवास थांबवतात. आपली सामाजिक व्यवस्था आणि परीक्षा पद्धत ही विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरतेय आणि ही बाब क्लेशदायक नाही का? आपण या सर्व गोष्टीकडे हताश वृत्तीने पाहत आहोत. हिंदुस्थानची शिक्षण पद्धती ही संपूर्णपणे परीक्षेच्या तीन तासांसाठी वाहिलेली आहे आणि यात तिळमात्र शंका नाही. हे तीन तास मुलांचे भवितव्य ठरवतात आणि त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे की नाही, हे ते निश्चित करतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कमी गुण मिळवणाऱया मुलांना त्यांच्या पालकांकडून सातत्याने कमी गुणांची जाणीव करून दिली जाते. “तू मागे पडला तर त्याच्यामुळे आम्हाला मान खाली घालावी लागत आहे,” असे काही पालक बोलताना दिसून येतात. यशाच्या या गुणांच्या निकषापासून दूर राहणाऱया मुलांच्या पालकांची अशीच प्रतिािढया कमी अधिक प्रमाणात दिसून येते आणि त्याचा मानसिक त्रास मुलांना सहन करावा लागतो. कमी गुण पडल्याने केवळ मुलेच हताश होत नाहीत, तर त्यांना असाही प्रश्न पडतो की, आपण खरोखरच पात्र आहोत की नाही? आपण कोठे प्रयत्नांत कमी पडलो? हे दोन्हीही प्रश्न मारकच आहेत. कारण त्याचे उत्तर सकारात्मक असो किंवा नकारात्मक, त्याचा परिणाम हा निराशावादाकडे आणि चिंतेकडे नेणारा आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेने यशाचा अर्थ एवढा संकुचित केला आहे की, हजारो मुले नैराश्य, भीती, शंका या भावनेत जगत राहतात. आपली विचारसरणी ही शाळेत शिकवल्या जाणाऱया पाठय़पुस्तकातील धडय़ांवर अवलंबून असते आणि त्यात आयुष्यभर घुटमळत राहते.

फिनलँड, सिंगापूर, जपान आणि जर्मनीत अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीला विरोध झालेला आहे. 1947 मध्ये जपानने शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी मूलभूत कायदा तयार केला. यानुसार मुलांचे व्यक्तिमत्त्व उभारणीचा आराखडा निश्चित करण्यात आला. कायद्यात म्हटले की, शिक्षणाचा अर्थ हा अप्रत्यक्षपणे एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवणे असा नाही, तर संपूर्ण समाजाला जबाबदार घटक करण्याचा आहे. आपली शिक्षण पद्धती ही समस्या केंद्रित न होता उत्तर केंद्रित असून ती प्रश्नांच्या अचूक उत्तराची अपेक्षा करत विद्यार्थ्यांच्या मेंदूचा भुगा करत आहे. बहुतांश पालक मुलांना सायकल चालवताना त्यांच्या पडण्याची भीती बाळगत नाहीत. कारण ही एक शिकण्याची प्रािढया आहे. मग शाळेच्या निकालात पहिल्याच टप्प्यापासून सर्वोत्तम गुण येण्याचीच अपेक्षा का केली जाते? मुलांना येणारे अपयश हे तात्पुरत्या रूपात आहे यावर त्यांना विश्वास नसतो का? जॉन होल्ट यांनी आपले पुस्तक ‘हाऊ चिल्ड्रन लर्न’मध्ये एक उदाहरण दिले आहे. लंडनच्या हॉलंड पार्कमध्ये खूप झाडी होती, त्या झाडाला दोऱया लटकलेल्या होत्या आणि मुलेही त्यावर झोका घेऊ शकत होते. होल्टने बागेची देखभाल करणाऱया व्यक्तीला विचारले की, खेळताना किती मुलांना मार लागतो. तो म्हणाला की, जेव्हा वयस्कर मंडळींना येण्यास मनाई केली तेव्हापासून एकही मुलगा जखमी झाला नाही. याचाच अर्थ मोठय़ांच्या सूचना ऐकून ऐकून मुलेही त्रस्त होतात आणि त्यांच्या समोर क्षमतेपेक्षा अधिक कसरत करण्याच्या नादात पडतात. आपल्या मुलांना त्यांच्या कुवतीपेक्षा अधिक विचार करण्यास भाग पाडण्याच्या नादात मुलांची आवड-निवड याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष करतो आणि त्यांचा आत्मविश्वासही ढळतो. एखादा पाल्य काम सुरू करतो तेव्हा त्याच्या मनात यश-अपयशाचा विचार येत नाही. तो केवळ आपली आवड आणि ते साध्य करण्याची मनीषा बाळगून असतो, परंतु जेव्हा वयस्कर मंडळींना आनंदी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा यश आणि अपयशाचे निकष लावले जातात. परीक्षा केव्हा आणि कोणत्या रूपातून असावी, याचादेखील विचार करायला हवा. कारण प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवरच्या परीक्षा मुलांत तुलनात्मक स्थिती निर्माण करतात आणि ते मुलांच्या हितासाठी योग्य नाही. जॉन होल्टने पुस्तक ‘हाऊ चिल्ड्रन फेल’ यात म्हटले की, मुलांना असे प्रश्न किंवा समस्या सांगाव्यात की, त्याचे उत्तर साचेबद्धरीत्या लिहिता येऊ नये. अर्थात प्रश्नाचे आकलन करून मनाप्रमाणे उत्तर लिहिणे गरजेचे आहे. त्याने समजेल अशाच भाषेत लिहावे, उदाहरणे द्यावीत. प्रश्नाचे प्रत्येक स्वरूप, स्थिती यांची ओळख पटवून त्यावर तो विचार करण्यास प्रवृत्त होणे अपेक्षित आहे आणि अशा नजरेतून आपण त्याकडे पाहिले पाहिजे.

पालकांना आपला विचार अधिक व्यापक करायला हवा. यशाचे निकष तीन तासांपुरते मर्यादित असता कामा नयेत. यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गुण आणि जीवघेण्या स्पर्धेतून बाहेर काढत शालेय शिक्षण पद्धतीला नवीन रूप देणे गरजेचे आहे. त्यात चांगले गुण मिळवण्यावर चर्चा करायला नको, बुद्धिमत्तेचे वास्तविक आकलन करून मानसशास्त्राrय व्यवस्था निर्माण करायला हवी. आपल्या आवडीच्या विषयानुसार मुले विकसित व्हावीत आणि आपल्या स्वप्नांना दररोज नवा आकार देण्यास ती सक्षम व्हावीत.

(लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)